Pimpri: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक पिंपरीत उभारणार

आदित्य बिर्ला ग्रुप करणार बांधकाम खर्च; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण बांधकाम खर्च आणि देखभाल दुरूस्ती खर्च आदित्य बिर्ला ग्रुपतर्फे करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी महापालिका बिर्ला ग्रुपला दोन एकर जागा देणार आहे. मात्र, जागेचा आणि स्मारकाचा ताबा महापालिकेकडेच राहणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी)झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

महापालिका हद्दीतील नागरिक, पर्यटकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शहरात महात्मा गांधी यांचे स्मारक असणे आवश्यक आहे. त्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालक राजश्री बिर्ला यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यामध्ये महापालिकेने किमान दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्यास बिर्ला ग्रुपमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारकाचा संपूर्ण बांधकाम खर्च आणि देखभाल दुरूस्ती खर्च बिर्ला ग्रुपतर्फे करण्यात येईल. तसेच ही जागा कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापरली जाणार नाही.

  • जागेचा आणि स्मारकाचा ताबा महापालिकेकडे राहील, असे नमुद केले होते. त्यानुसार, आदित्य बिर्ला ग्रुपला पिंपरी येथील सिटी सर्व्हे क्रमांक 4 हजार 694 मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भुखंड आणि महावितरणच्या उपकेंद्रा करिता आरक्षित असलेले 6 हजार 806 चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने संपूर्ण बांधकाम खर्च व देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.