Pimpri : महापालिका प्रशासनाने कच-याबाबत योग्य ती पावले उचलावीत – दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील घरोघरीचा कचरा एकत्र करुन तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेणे. या कामासाठी नियमित ठेकेदाराची नियुक्ती अद्याप झाली नसल्यामुळे जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून कचरा संकलनाचे काम करुन घेण्यात येत आहे. शहरात कच-याची स्थिती गंभीर असून प्रशासनाचे योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, आजही शहरामध्ये मागील दोन वर्षापूर्वी जी कच-यांची स्थिती होती तशीच आहे. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग दृष्टीस पडतात. ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. त्या कच-याने भरुन वाहत आहेत. तसेच शहरातील मोकळ्या जागेत सुध्दा मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो तो वेळोवेळी उचला जात नाही. त्यामुळे परीसरामध्ये दुर्गंधी सुटून रोगराई होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील पवना नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कुंड ठेवलेले आहेत ते सुध्दा भरुन वाहत आहे. एकूणच शहरात कच-याची स्थिती गंभीर आहे.

  • तसेच आता उन्हाळा संपत आला असून लवकरच पावसाळा सुर होणार आहे. परंतु अद्याप शहरातील नालेसफाई विषयी प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही. शहरातील ओढे, नाले याची वेळेवर साफसफाई झाली नाही तर, पावसाचे पाणी या नाल्यांमध्ये तुंबून शेजारील लोकवस्ती घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्त व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व ओढे, नाले व गटर्स यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणे अत्यावश्यक आहे.

शहरातील घरोघरीचा कचरा एकत्रित करुन तो मोशी येथील कचरा डेपोवर नियमितपणे हलविण्यात यावा. यामुळे शहरात कचरा साठून राहणार नाही. तसेच शहरातील ओढे, नाले आणि गटर्स याची पावसाळा सुरु होण्यापूर्वी साफसफाई करण्यात यावी. म्हणजे पावसाचे पाणी तुंबून नागरीकांची गैरसोय होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.