Pimpri: कोरोना सर्वेक्षणासाठी पालिकेने विकसित केले ‘सोबती’ ॲप

The municipality has developed 'Sobti' app for corona survey

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोविड -19 अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी स्मार्ट सारथी अंतर्गत ‘सोबती’ ॲप विकसित केले आहे.

या ॲपचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यावेळी उपस्थित होते.

या ॲपचा वापर हा वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत नेमण्यात आलेल्या सर्वेक्षण टीम अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी केला जाईल.

यामध्ये वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे वर्गीकरण करून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

कोरोना बाबत नागरिकांमध्ये काही लक्षणे जाणवल्यास त्याची नोंद घेणेत येईल. तसेच त्या नागरिकांना तपासणीसाठी पाठवले जाईल.

याद्वारे शहरातील कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात आहे हे समजण्यासाठी योग्य वेळी, योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास याचा उपयोग होणार आहे.

हे ॲप अँड्रॉइड तथा आयओएस या दोन्ही फोनवर चालेल. आजपर्यंत अठराशे नागरिकांची नोंद सर्वेक्षण टीम अंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे.

याद्वारे खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना बाबतच्या लक्षणांच्या नागरिकांची देखील नोंद घेण्यात येईल. सर्व खासगी दवाखान्यांना देखील या ॲपद्वारे आपल्याकडे आलेल्या नागरिकांची नोंद करता येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.