Pimpri: साडेतीन तासाच्या ‘फेसबुक लाईव्ह’वर पालिकेने उधळले तब्बल तीन लाख
The municipality spent over three lakhs on three and a half hours of 'Facebook Live'

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोरोना आपत्तीचे रुपांतर इष्टापत्तीत केल्याचे दिसून येत आहे. ‘कोरोना सोबत जगताना काही काळजी घ्यावी’ याबाबतच्या महापौर, आयुक्तांसह विविध मान्यवरांच्या फेसबुक लाईव्हसाठी तब्बल 2 लाख 83 हजार रुपये मोजले आहेत.
सातवेळा अर्ध्या तासाकरिता असे केवळ साडेतीन तास फेसबुक लाईव्ह झाले आहे. त्याकरिता एवढ्या पैशांची उधळपट्टी केल्याने करदात्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षात एवढे पैसे खर्च करूनही फेसबुकद्वारे शहरवासीयांची जनजागृती झालेली दिसत नाही. विशेष म्हणजे एवढे पैसे घेऊन त्रयस्थ संस्थेने फेसबुकद्वारे नक्की काय काम केले, हे संबंधित अधिकाऱ्यालाही माहीत नाही.
महापालिकेकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये राबविलेल्या जवळपास सर्वच उपाययोजना वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मास्क खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. त्याची चौकशीही सुरु आहे.
सॅनिटायजर खरेदीबाबतही मोठा गोंधळ झाला आहे. त्यावर देखील आरोप झाले आहेत.
त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक विषयांची माहिती फेसबुकद्वारे देण्यासाठी मे. डिझायर ग्राफिक्स या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती.
हे प्रकरण देखील वादात सापडले आहे. या संस्थेला फेसबुक लाईव्ह, आणि कोरोना रुग्णांची विविध माहिती फेसबुकवर टाकण्यासाठी तब्बल 2 लाख 83 हजार 554 रुपये देण्यात आले आहेत.
कोविड 19 बाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, सामाजिक अंतर, कंटेन्मेंट झोन बाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भातील सूचना देणे, समाजातील सर्व स्तरांतील अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे फेसबुक लाईव्ह माध्यमातून लोकांशी संवाद साधणे या कामांचा समावेश होता.

तथापि, या संस्थेने दोन महिन्यांत फक्त सात फेसबुक लाईव्ह केले आहेत. प्रत्येक फेसबुक लाईव्ह अर्ध्या तासाचे होते. म्हणजे एकूण साडेतीन तास फेसबुक लाईव्ह केले आहे.
यामध्ये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर माई ढोरे, उद्योग व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर आदी लोकांचा समावेश होता. तर, अजून दोन विषयांतील तज्ज्ञांचे फेसबुक लाईव्ह होणार असण्याचे सांगितले जात आहे.
या कामासाठी पालिकेने या संस्थेला सुमारे तीन लाख रुपये मोजले आहेत. या संस्थेने महापालिकेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून विशेष असे काहीही काम केले नाही.
फेसबुक पेजद्वारे शहरातील नागरिकांना कोरोना रुग्ण, बरे झालेले रुग्ण, कंटेन्मेंट झोन या बाबतची दररोजची माहितीही उपलब्ध होत नाही.
आयुक्तांनी केलेल्या फेसबुक लाईव्हचा आवाज येत नसल्याने अनेक नागरीकांनी फेसबुक पोस्टच्या कॉमेंट बॉक्समध्ये तक्रारही केल्या होत्या.
कोणतेही विशेष काम न करता या संस्थेला एवढे पैसे दिल्याने कोरोनाच्या काळात आता फेसबुक लाईव्हमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतच्या अवलोकनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली.
याबाबत बोलताना माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, ”कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक पेजवर विविध प्रकारची माहिती टाकण्यासाठी मे. डिझायर ग्राफिक्स या संस्थेला काम देण्यात आले होते.
फेसबुक पेजद्वारे आतापर्यंत अर्ध्या तासाचे सात लाईव्ह करण्यात आले आहेत. त्यासाठी या संस्थेला 2 लाख 83 हजार रुपये देण्यात आले आहेत”.