pimpri: महापालिका प्रत्येक झोपडीधारकास देणार चार मास्क, दोन साबणाच्या किट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील प्रत्येक झोपडीधारकास चार मास्क आणि दोन साबणाच्या किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी आणखी करावा लागणा-या उपाययोजनांसदर्भात महापालिका पदाधिकारी आणि अधिका-यांची आज (सोमवारी) बैठक पार पडली. महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक विलास मडिगेरी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात आजपर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात झोपडपट्यांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील प्रत्येक झोपडीधारकास चार मास्क आणि दोन साबणाच्या किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा आजार व प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरातील सर्व झोपडीधारकांच्या कुंटुबाची स्वच्छता ठेवण्यास यामुळे मदत होणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. स्वच्छता राखावी, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.