Pimpri : कर्मचारी महिलेच्या बदनामी प्रकरणात विरोधी पक्षनेत्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला कोर्टाकडून समन्स

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील एका कर्मचारी महिलेविषयी बदनामीकारक वक्तव्य आणि महानगरपालिका आयुक्तांकडे खोटी तक्रार करून अपमानित केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका विनया तापकीर यांना खडकी न्यायालयाने समन्स बजावले आहे. महापालिकेतील कर्मचारी महिलेवर चुकीचे आरोप केल्यामुळे नगरसेवकांना न्यायालायात खेचण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

दत्ता साने आणि विनया तापकीर यांनी महानगरपालिका कर्मचारी महिला मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांच्यावर मीटर विक्रीबाबत गैरव्यवहार करत असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे चतुर्वेदी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यावेळी चतुर्वेदी यांनी आपल्याविरुध्द खोट्या आरेपाच्या आधारे चुकीची कारवाई झाल्याची लेखी दाद महानगरपालिका प्रशासनाकडे मागितली होती. परंतु, त्याचा विचार न झाल्याने त्यांनी झालेल्या अन्यायाविरोधात खडकी न्यायालयात खटला दाखल केला.

  • चतुर्वेदी यांनी साने आणि तापकीर यांनी त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक व्यक्तव्य करून लाच घेण्याचे आरोप करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे खोटी तक्रार केल्याने चतुर्वेदी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. कोणतेही पुरावे नसताना कट रचून खोट्या माहिती पसरवून बदनामी आणि एकप्रकारे अपमानित केेल्याचे म्हणणे खडकी न्यायालयापुढे मांडले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. सोनवणे यांनी या तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी गुन्हा दिसून आल्याने नगरसेवक दत्ता साने आणि विनया तापकीर यांना भारतीय दंड विधान संहिता 500 नुसार न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तसे समन्स या दोघांना बजावले आहे. चतुर्वेदी यांच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड. एन. डी. पाटील, अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. अनुज मंत्री, अ‍ॅड. करिश्मा पाटील, अ‍ॅड. शुभांगी जेटीचोर, अ‍ॅड. रेश्मा सोनार यांनी कामकाज पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.