Pimpri: शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दहा हजार पार; चार दिवसात दोन हजार रुग्णांची भर

The number of corona patients in the city crossed ten thousand; Over two thousand patients in four days मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  मागील चार दिवसांत म्हणजेच 15 ते 18 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.  आज (शनिवारी) दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत 236 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 10085 झाली आहे. 10 मार्च ते 18 जुलै या 141 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या दहा हजाराच्या पुढे गेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला चारशे, पाचशे जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून दहा दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाउन कालावधीत देखील रूग्ण वाढ वेगाने होत आहे.

14 जुलै पर्यंत शहरातील रुग्णसंख्या आठ हजार होती. त्यानंतर 15 ते 18 जुलै या अवघ्या चार दिवसात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 10085 वर पोहोचली आहे. आज दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत  तब्बल 236 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या दहा हजार पार झाली आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 4052 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 2835 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 1052 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 938 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 1198 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

6350 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 3566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 6350 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजमितीला 3566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 2323 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 382 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 202 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत शहरातील 171 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.