Pimpri: 15 ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोना बाधितांची संख्या 50 हजार होईल – आयुक्त हर्डीकर

Pimpri: The number of corona patients in the city will reach 50,000 until August 15 says Commissioner Shravan Hardikar आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जूनखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजार, जुलैच्या मध्यात 8 हजार रुग्ण होतील असा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या 12 हजार झाली. त्यावेळी रुग्णसंख्या दुपट्ट होण्याचा कालावधी 11 दिवसांचा होता. त्यानंतर आत्ता डबलिंग रेट 14 ते 15 दिवसांपर्यंत जाईल. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजार होईल, असा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना वर्तविला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन सुविधांमध्ये वाढ केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ होत आहे. लॉकडाऊन कालावधीत देखील रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 19 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. विमानातून आलेल्या कोरोनाने सुरुवातीला गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर शहरातील झोपडपट्यांना विळखा घातला आणि आता पुन्हा गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरात रुग्णवाढ होऊ लागली आहे.

दि. 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होण्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. केवळ 15 दिवसांत 30 हजार नवीन रुग्णांची वाढ होण्याच्या अंदाज वर्तविण्यात आल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील सर्वाधिक रुग्णवाढ होणा-या शहरात पिंपरी-चिंचवडची गणना होऊ लागली आहे. पिंपरीसह ठाणे, नवी मुंबईत रुग्ण वाढ होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन केला होता. लॉकडाऊनच्या काळात चाचण्या वाढविल्या होत्या. त्यावेळी रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 11 दिवसांचा होता. 9 वरुन तो 11 दिवसांवर गेला होता.

सध्याच्या आकडेवारीनुसार 14 ते 15 दिवसांपर्यंत डबलिंग रेट जाईल. शहरातील रुग्णसंख्या 12 हजार झाली. त्यावेळी डबलिंग रेट 11 दिवसांचा होता. त्यानंतर आत्ता 14 ते 15 दिवसांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल. त्यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असेल.

लॉकडाऊनमध्येही मोठ्या संख्येने रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे लॉकडाऊनचा काय उपयोग झाला असे विचारले असता आयुक्त हर्डीकर म्हणाले, लॉकडाउनमध्ये चाचण्या वाढवू शकलो. जवळपास साडेतीन ते तीन हजार आठशे प्रतिदिन चाचण्या वाढविल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत 10 हजार रुग्ण ओळखले. त्यांना बाहेर काढले. नवीन 10 हॉस्पिटल आणि चार हॉटेल खासगी सुविधेत वाढविले. पालिकेच्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये 1500 जादा बेडची सुविधा केली. नवीन चार दिवसात आणखी 1500 बेडची वाढ होईल. 200 ऑक्सिजन बेड वाढविले आहेत. तर, वायसीएममध्ये 30 आयसीयू बेड वाढविले आहेत.

दरम्यान, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जूनखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजार, जुलैच्या मध्यात 8 हजार रुग्ण होतील असा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.

जुलैच्या अखेरपर्यंत 24 हजार रुग्ण होण्याचा आयुक्तांनी वर्तविलेला अंदाजही खरा होताना दिसून येत आहे. आता 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या 50 हजार होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.