Pimpri: शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजार पार; जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा आयुक्तांचा अंदाज

The number of coronaries in the city exceeded three thousand; The commissioner estimates that there will be 10,000 patients by the end of July

0

शहरवासीयांच्या चिंतेत भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रूग्ण संख्या तीन हजार पार झाली आहे. आज मंगळवारी (दि.30) दुपारी तीन वाजेपर्यंत 100 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 3007 झाली आहे. 10 मार्च ते 30 जून या 123 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे. रेडझोनमधून वगळल्यानंतर तब्बल 2742 नवीन रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जूनखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजार होईल असा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. आता जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले.

शहराला कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत.

सर्वाधिक रुग्णवाढ पिंपरी भागातील जुन्या झोपडपट्यांमध्ये होत आहे. दापोडी, नेहरुनगर, विठ्ठलनगर, भाटनगर, बौद्धनगर, आनंदनगर, साईबाबानगर, अजंठानगर या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. शहरातील पाच झोपडपट्यांमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. जवळपास दोन हजार रुग्ण झोपडपट्यांतील आहेत.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला दीडशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

मार्च, एप्रिल, मे अर्धा या अडीच महिन्यात शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात होती. 10 मार्च ते 22 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 265 वर जाऊन पोहोचली होती. त्यातच 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले.

रेडझोनमधून वगळल्याने महापालिकेने विविध सुविधा सुरु केल्या. बाजारपेठा, दुकाने, कंपन्या सुरु करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी, नागरिकांची बाहेर वर्दळ वाढली आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. परंतु, निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली. ही रुग्ण वाढ सुरुच आहे.

सात दिवसात एक हजार नवीन रुग्णांची वाढ

रेडझोनमधून वगळल्यानंतर तब्बल 2742 नवीन रुग्ण सापडले आहेत. 23 जूनला रुग्णसंख्या दोन हजार झाली होती. त्यांनतर अवघ्या सात दिवसात एक हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 3007 वर पोहोचली आहे.

आज दुपारी तीन वाजेपर्यंतच तब्बल 100 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे.

1859 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 1101 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 1859 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजमितीला 1101 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

त्यापैकी तब्बल 955 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 112 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 32 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत 47 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 1178 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 788 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 382 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 326 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 330 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like