Pimpri: नगरसेवकांची संख्या वाढणार, 144 पर्यंत होण्याची शक्यता

नव्याने वॉर्ड रचना होणार, वॉर्डाची संख्या देखील वाढणार

एमपीसी न्यूज – महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय पद्धती ऐवजी वॉर्ड पद्धतीने होणार आहे. नव्या बदलात पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 16 ने वाढू शकते. शहरातील लोकसंख्येची जनगणना देखील सुरु झाली आहे. सुमारे 25 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढणार असून 144 पर्यंत होण्याची शक्यता आहे. नगरसेवक संख्या जेवढी तेवढ्याच वॉर्डची रचना होऊ शकते. दरम्यान, सध्या महापालिकेची 128 नगरसेवक संख्या आहे.

राज्य सरकारने प्रभाग पद्धती ऐवजी वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा होईल, असा विश्वास शिवसेना-राष्ट्रवादी – काँग्रेसला आहे. तर, सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यापूर्वी शहरातील लोकसंख्येची जनगनणा होणार आहे. सन 2001 मध्ये शहराची लोकसंख्या 10 लाख होती.

तर, 2011 च्या जनणगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे 17 लाख 27 हजार 692 आहे. 2001 ते 2011 या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल साडेसात लाखाने वाढली होती. मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखाच्या आसपास आहे. शहरातील जनगणना सुरु झाली असून 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणा-या महापालिका निवडणुकीसाठी त्याच जनगणनेनुसार प्रभागाची रचना केली जाईल. 25 लाखाच्या पुढे लोकसंख्या गेल्यास नगरसेवकांची संख्या 144 होऊ शकते.

सन 1978 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी शहराची लोकसंख्या 83 हजार 542 होती. 1982 मध्ये महापालिकेत रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळेसौदागर, सांगवी, पिंपळेनिलख, थेरगाव, वाकड ही गावे समाविष्ट झाली. त्यानंतर 1986 ते 1992 दरम्यान शहराची लोकसंख्या दोन लाख 49 हजार 364 होती. 11 सप्टेंबर 1997 मध्ये तळवडे, चिखली, मोशी, डूडूळगाव, वडमुखवाडी, दिघी, दापोडी, भोसरी, सांगवी, पिंपळे निलख, वाकड, पुनावळे, किवळे, मामुर्डी, चोविसावाडी, च-होली, बोपखेल, रावेतचा उर्वरीत भाग देखील महापालिकेत समाविष्ट झाला. 1997 मध्ये पाच लाख 17 हजार 83, 2002 मध्ये सहा लाख 24 हजार 759 आणि 2007 मध्ये 10 लाख 6 हजार 622 शहराची लोकसंख्या होती. तर, 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी शहलाची लोकसंख्या 17 लाख 27 हजार होती.

याबाबत बोलताना निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराची सन 2021 मध्ये जनगणना पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणा-या महापालिका निवडणुकीसाठी त्याच जनगणनेनुसार प्रभागाची रचना केली जाईल. 25 लाखाच्या पुढे लोकसंख्या गेल्यास नगरसेवकांची संख्या 144 होऊ शकते”.

..असे आहे पक्षीय बलाबल!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपची निविर्विदा सत्ता आली आहे. चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. भाजपचे 77 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 असे 128 नगरसेवक आहेत.

……………………………………………………………………………………….
निवडणुकांचे वर्ष,       प्रभाग पद्धती          नगरसेवकांची संख्या
1978                       एकसदस्यीय (वॉर्ड)           42
1986                       एकसदस्यीय                    60
1992                       एकसदस्यीय                    78
1997                       एकसदस्यीय                    79
2002                      तीनसदस्यीय (प्रभाग)      105
2007                      एकसदस्यीय वॉर्ड           105
2012                       द्विसदस्यीय (प्रभाग)       128
2017                       चारसदस्यीय                 128

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.