pimpri: परदेशवारी केलेल्यांचा आकडा वाढतोय; तब्बल तेराशे जण ‘होम क्वारंटाईन’मध्ये 

साडेचार लाख नागरिकांचे सर्वेक्षण ; मागील सहा दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही

0

एमपीसी न्यूज – परदेशावारी करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दोन महिन्यात कोरोना बाधित देशातून तब्बल एक हजार 306 नागरिक शहरात आले असून, त्यांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांनी 28 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक आहे. नागरिक आता स्वत:हून पुढे येत परदेशवारीची माहिती देत आहेत. तर, शहरातील चार लाख 47 हजार 369 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 12 वर स्थिर आहे. मागील सहा दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही.  

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 169 व्यक्तींचे कोरोना तपासणीकरीता घशातील द्रावांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 129 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 12 आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिकेच्या आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. 

तसेच आज (गुरुवारी)  27 व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.   त्यांच्या घशातील द्रावाचे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, आज  अखेर शहरातीलचार लाख 47 हजार 369  नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

 चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधून शहरात आलेल्या एक हजार 306 नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28  दिवसांपर्यंत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. 


सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील 14 दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

HB_POST_END_FTR-A2
You might also like