Pimpri : पिंपरी, वाकड परिसरातून एक लाखाचे सोने पळवले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचे 35 हजारांचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना पिंपरी येथे घडली. तर भाजी खरेदी करत असलेल्या महिलेचे 60 हजारांचे गंठण चोरी केल्याचा प्रकार रहाटणी येथे घडला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ५) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिना दिपक पाखले (वय 37, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी रिना या मोरवाडी येथील मोरजाई मंदिर परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी तोंडाला काळे फडके बांधलेले दोन चोरटे दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी रीना यांच्या उजव्या खांद्यावर मारून गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, हिसका देताना चोरट्यांच्या हातात त्याचा केवळ 10 ग्रॅम वजनाचा 35 हजार रुपये किमतीचा भाग आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

केशर गणपत वीर (वय 55, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. केशर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केशर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास काळेवाडी-पिंपरी रोडवर नवकर ज्वेलर्सच्या दुकानासमोर भाजी खरेदी करत होत्या. भाजी खरेदी करत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि डौल असे 60 हजार रुपये किमतीचे सोने पळवले. याबाबत गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.