Pimpri : ज्याला बोट धरून दुनिया दाखवली, आज त्यानेच पाठ फिरवली

एमपीसी न्यूज – जन्म दिला, ओळख दिली, दुनिया दाखवली, दुनियेतली माणसं ओळखायला शिकवली. त्याच दुनियेत तो एवढा हरवला की आपला जन्मदाता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना सुद्धा त्याच्याकडे यायला सुद्धा त्याला वेळ मिळला नाही. दोन्ही मुलांनी जन्मदात्या बापाकडे पाठ फिरवली. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने वृद्ध बरे झाले, पण त्यांना घरी न्यायला देखील मुले येत नाहीत. आजच्या ग्लोबल जगाची ही मोठी शोकांतिका आहे.

बाबाजी धोंडीभाऊ झरे (वय 70, रा. झरेवाडी, ता. खेड) असे त्या कमनशिबी वृद्ध पित्याचे नाव आहे. बाबाजी मागील एक महिन्यापासून पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते आता बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, नातेवाईक नसल्यामुळे त्यांना घरी सोडले जात नाही. रुग्णालयाकडून संबंधित रुग्णाला जबाबदार व्यक्तीच्या ताब्यात सोपवले जाते. पण जबाबदार व्यक्ती येतच नसल्याने बाबाजी एक आठवड्यापासून रुग्णालयात पडून आहेत.

  • वैद्यकीय समाजसेवक एम. ए. हुसेन यांच्या रियल लाईफ या समाजसेवी संस्थेकडून बाबाजी यांची मागील एक महिन्यापासून संपूर्ण देखभाल केली जात आहे. हुसेन यांनी सांगितले की, ‘बाबाजी दिघी येथे एका दुचाकीच्या धडकेत 23 जून रोजी जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत रस्ताच्या बाजूला पडलेले पाहून स्थानिक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून त्यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डावा पाय, डावा हात, कमरेला, मानेला त्यांना गंभीर दुखापत झाली होती. मरणासन्न अवस्थेत त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु झाले.

बेवारस म्हणून त्यांची रुग्णालयात नोंद करण्यात आली. त्यांच्यावर तातडीचे उपचार केल्यानंतर ते एक-दोन दिवसांनी बोलू लागले. दरम्यान, त्यांची संपूर्ण जबाबदारी रियल लाईफ या समाजसेवी संस्थेने घेतली होती. बाबाजींनी त्यांना भरपूर शेती असल्याचे सांगितले. ते खेड तालुक्यातील राजगुरूनगर जवळ झरेगाव येथे त्यांचे घर असून त्यांना दोन मुले असल्याचेही सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस ठाण्याशी आणि काही सामाजिक संस्था व नागरिकांशी संपर्क करून याबाबत माहिती मिळवली. ही माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले.

  • बाबाजी यांना दोन मुले आहेत. एक मुलगा गवंडी काम करतो. तो फार भोळा आहे. त्याला फक्त घर आणि काम एवढंच माहिती आहे. याव्यतिरिक्त काही काम सांगितल्यास तो घाबरतो. तर दुसरा काय काम करतो हे त्यांना माहिती नाही. त्याने बाबाजी यांच्या नावाने शेतीवर सोसायटी काढली. तिची परतफेड त्याने व्यवस्थित केली नाही. शेतीवर कर्ज झाले. मुले शेतीही करीत नाहीत. त्यांचाही व्यवस्थित सांभाळ करीत नाहीत. त्यामुळे बाबाजींना घराबाहेरच जास्त वेळ काढावा लागत असे.

दिघी येथे फिरत असताना त्यांना एका दुचाकीने धडक दिली. त्यात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात आणले आणि त्यांच्यावर उपचार झाले. रियल लाईफ संस्थेकडून घरच्यांना वेळोवेळी संपर्क केला जात आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळत नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनासह रियल लाईफ संस्था देखील अचंबित झाली आहे. आपल्या वडिलांचा एवढा तिरस्कार करणारी मुले असू शकतात, ही कल्पना देखील करवत नाही.

  • आजच्या धकाधकीच्या जीवनात तथाकथित उच्चभ्रू लोकांकडून त्यांच्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी ती मुले हजारो रुपये मोजण्यासाठी तयार असतात. मेट्रो लाईफ मध्ये आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नसल्याने त्यांनी हा पर्याय शोधला आहे. पण ज्यांना कसलेच काम नाही. जे आपल्या आई-वडिलांना सांभाळू शकतात, अशा लोकांचं काय? हा प्रश्न कायम आहे. याचा अर्थ तथाकथित उच्चभ्रू त्यांच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडतात, याचे इथे समर्थन नाही. ते देखील चुकीचेच आहे. पण सर्वसामान्य लोकांच्या जगण्यासाठी आई-वडील नावाची संजीवनी आवश्यक आहे, हे मात्र विसरता कामा नये.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.