Pimpri: पवना धरण क्षेत्रात चोवीस तासांत 59 मिमी पावसाची नोंद; गतवर्षी आजच्याच तारखेला होता 100 टक्के साठा

Pimpri: The Pawana Dam area has received 59 mm of rainfall in the last 24 hours पवना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून आज मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 59 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एमपीसी न्यूज – मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत केवळ 59 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 32.43 टक्के आहे. तर, मागीलवर्षी आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात तब्बल 2313 मिमी पावसाची नोंद झाली होती. धरण 100 टक्के भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 68 टक्के कमी पाणीसाठा आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यातील जुन, जुलै दोन महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात काहीच पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

दोन महिन्यांपासून ओढ दिलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात चांगला पडेल अशी सर्वांना आशा आहे. रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून आज मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 59 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तर, जूनपासून आजपर्यंत 561 मिमी पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात पडला आहे. पुढील चार ते पाच दिवस सलग असा पाऊस पडला. तर, धरणातील पाणी साठ्यात वाढ होईल असे, पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडकर मागील नऊ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. यंदा पावसाने ओढ दिली आहे. मागीलवर्षी आजच्या तारखेला धरण 100 टक्के भरले होते. यंदा आजमितीला केवळ 32.43 टक्के पाणीसाठा आहे.

पावसाला सुरुवात झाली आहे मात्र दमदार पाऊस झाला नाही. तर, शहरवासीयांवरील पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जावू शकतो. पालिका प्रशासनाकडून तशी भीती व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.