Pimpri : खिंवसरा पाटील शाळेच्या पालक-शिक्षक सहलीत कृषी पर्यटनाचा लुटला आनंद; 150 पालकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आळंदी आणि निघोजे येथे पालक-शिक्षक सहल काढली. या सहलीत सर्वांनी कृषी पर्यटनाचा आनंद घेतला. पालक आणि शिक्षक यांचा सहवास वाढणे हे पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला पोषक आहे. त्यामुळे या सहलीचे आयोजन केले होते. या सहलीत सुमारे 150 पालकांनी सहभाग घेतला.

आळंदी येथील गजानन महाराजांच्या मंदिराचे भव्य बांधकाम व महाराजांची सुबक मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. तसेच निघोजे गावातील चारुज फार्म हाऊस येथील मन मोहून टाकणा-या रंगबिरंगी गुलाब फुलांच्या शेतीची पाहणी केली. विविध औषधी वनस्पती, पाॅलीहाऊस शेती, शेळ्या, बकर्‍या, गायी, म्हशी, कोंबड्या यांच्या विविध जाती, शहामृग यांचा मुक्त वावर पाहून निसर्गाच्या खूप जवळ गेल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. तेथील टर्की नावाची भली मोठी कोंबडी व शहामृगाची भली मोठी अंडी या गोष्टी विशेष आकर्षणाच्या ठरल्या.

जलतरण तलाव, स्वच्छता, पाण्याचे व्यवस्थापन, कर्मचारी वर्गाचे आदरातिथ्य, सोयी-सुविधा या सर्वच गोष्टी सर्वांसाठी लक्षवेधी ठरल्या. निघोजे गावचे सरपंच आशिष येळवंडे हे खिंवसरा पाटील शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी या सहलीत स्वतः लक्ष घातले. तसेच शाळेच्या बांधकाम मदतीसाठी 51 हजार रुपयांची देणगी देखील दिली.

स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी केले. आशिष येळवंडे या एका कर्तृत्ववान युवकाने तेजस्वी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केल्याने खर्‍या अर्थाने ‘युवक दिन’ साजरा झाल्यासारखे वाटले. स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत शिवाजी पोळ यांनी सादर केले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे मनोगत लोकमान्य टिळक माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका त्रिवेणी खामकर यांनी व्यक्त केले. शाळेकडून आशिष येळवंडे यांचा सन्मान मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर व बालविभाग प्रमुख आशा हुले यांनी केला. तर शीतल येळवंडे यांचा सन्मान सहशिक्षिका वीणा तांबे यांनी केला.

शाळेकडून झालेल्या सन्मानाला उत्तर देताना आशिष येळवंडे म्हणाले, “मला घडविण्यात शाळेचा मोठा वाटा आहे. शिक्षकांकडून कौतुक होणे ही केलेल्या कामाचा आनंद देणारी पावती आहे. गावचे गावपण जपण्याचा प्रयत्न करताना पर्यावरणाला धरुन गावाचा विकास करण्याचे काम करत असल्याचे समाधान आहे.”

शिक्षकांनी आयोजित केलेल्या विविध गंमतीदार खेळात पालकांनी आनंदाने सहभाग घेतला. गाण्यांच्या भेंड्या व नृत्य अशी कौशल्य सादर करणार्‍या पालकांना व शिक्षकांना इतरांनी दाद देऊन त्यांचा उत्साह वाढविला. सहल आयोजनात सहशिक्षिका प्रमोदिनी बकरे यांनी पुढाकार घेतला. तसेच या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी निलेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सहलीच्या यशस्वीतेसाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संस्था पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व पालक या सर्वांनीच सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like