Pimpri: रस्त्यांच्या यांत्रिक सफाईच्या 742 कोटीच्या कंत्राटासाठी सत्ताधा-यांची पुन्हा धावपळ!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोरोना’च्या विषाणूच्या प्रार्दुभावाने उचल खालली असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजप मात्र शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या वादग्रस्त 742 कोटी रुपयांच्या कंत्राटात गुरफटले आहेत. काहीही करुन हे कंत्राट लवकरात लवकर मार्गी लागावे. यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी एका आमदाराच्या भावाने पुढाकार घेतला असून जुळवाजुळव सुरु केली आहे. आमदार बंधुने आज (शुक्रवारी) वरिष्ठ अधिका-यांशी आणि विरोध करणा-यांसोबत ‘गुफ्तगू’ केले. त्यामुळे सर्वपक्षीयांची मिलिभगत असलेले कंत्राट मार्गी लावण्यासाठीच्या जुळवाजुळवीला पुन्हा वेग आला आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी एक संयुक्त निविदा न काढता सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत निविदा काढली आहे.

तांत्रिक छाननीमध्ये 6 पॅकेजसा’ठी 6 कंत्राटदारांनीच आलटून-पालटून सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले. या कामाचा खर्च वार्षिक 97 कोटींवरुन 106 कोटी रुपये झाला आहे. ‘आरएफपी’ मध्येच आयुक्तांनी परस्पर फेरबदल केले. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. भाजपमधील काही लोकप्रतिनीधींनी विरोध केल्याने मागील स्थायी समिती समोर हे कंत्राट मान्यतेसाठी आले नाही.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यानच्या काळात यांत्रिकरणाची निविदा प्रसिद्ध केल्यापासून आणि उघडल्यानंतर अनेकवाद, विवाद, आंदोलने झाल्याने महापालिकेची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे या निविदेची कार्यवाही तत्काळ बंद करुन निविदा रद्द करण्यात यावी, अशी सूचना सत्ताधारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी 2 मार्च रोजी आयुक्तांना केली होती. सध्या या कंत्राटाची कार्यवाही ‘जैसे थे’ आहे.

भोसरीतील संतोष लोंढे स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर आता पुन्हा हे कंत्राट मार्गी लावण्यासाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. राजकीय पदाधिकारी, प्रशासन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात गुंतले असल्याची नामी संधी साधत मोजक्या सत्ताधारी पदाधिका-यांनी यांत्रिकीकरणाचे कंत्राट मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या गाठीभेट घेत डावपेच आखले जात आहेत. आमदार बंधुने आज वरिष्ठ अधिका-यांशी ‘गुफ्तगू’ केले. तसेच शिवसेनेच्या शहर पातळीवरील एका पदाधिका-याशी देखील चर्चा केली. विरोध मवाळ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.