Pimpri : योगेश तोडकरी लिखित ‘अवर ड्रीम इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – स्वतःच्या भविष्याविषयी स्वप्न रंगविणारे सगळेच असतात पण आपल्या देशाविषयी उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहून त्या दिशेने प्रयत्नाचे पाऊल उचलणारे फार कमी जण असतात. अशा शब्दात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड सतीश गोरडे यांनी युवा लेखक योगेश तोडकरी यांचे कौतुक केले. योगेश तोडकरी लिखित ‘अवर ड्रीम इंडिया’ या  पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
यावेळी प्रभू स्वामीजी, क्रांतिवीर चापेकर समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी व शाला समिती अध्यक्ष गतिराम भोईर, रिना मेहता, प्रा. विनोद तोडकरी, साहित्यिका बाबू डिसोझा, लेखक योगेश तोडकरी, अंकिता प्रकाशनच्या संचालिका अंकीता नगरकर, प्रा. दलाल, स्नेहा तोडकरी, क्रांतिवीर चापेकर समितीचे सदस्य आसाराम कसबे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, स्मिता जोशी, मुख्याध्यापिका वासंती तिकोने, जगन्नाथ देवीकर, नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, अतुल आडे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
  • लेखक योगेश तोडकरी यांनी आपल्या विदेशातील वास्तव्यात आलेले अनुभव, तेथील प्रशासन व्यवस्था, सार्वजनिक सोयी सुविधांचा सुयोग्य वापर, कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची स्वयंशिस्त, स्वच्छता याबाबत माहिती दिलेली आहे. भारत देशातही त्याची अमंलबजावणी सहज सोप्या पद्धतीने करुन विकसनशील भारताचे रुपांतर विकसीत भारतामध्ये करु शकतो या विषयीची मांडणी सुलभ इंग्रजी भाषेतून केली आहे. अन्य भारतीय भाषांमध्येही त्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचा मानस प्रकाशक व लेखकाचा आहे.

रिना मेहता यांनी सुदृढ सशक्त भारत निर्मितीचे डोळसपणे पाहिलेले स्वप्न अशा सन्मानपूर्वक शब्दांत लेखकाच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक केले. नवोदित लेखकांनी लिहिलेली पुस्तके अल्पदरात वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम अंकिता प्रकाशन करत आहे असे प्रकाशक अंकिता नगरकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
  • ज्येष्ठ साहित्यिक  बाबू डिसोझा यांनी पुस्तकातील विषय मांडणी, छपाई याबाबत विशेष कौतुक केले. प्रा.विनोद तोडकरी यांनी आजची युवापिढी अधिक समजदार असून ती आपले विचार अधिक समर्थपणे मांडू शकते याबाबत समाधान व्यक्त केले. अशा पुस्तकांचा समावेश क्रमिक पुस्तकांमध्ये व्हावा अशी अपेक्षा संजय कुलकर्णी व गतिराम भोईर  यांनी केली व पुस्तकाच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रभू स्वामीजींचेही शुभाशीर्वाद लाभले.
सूत्रसंचालन सुनंदा नगरकर यांनी केले तर आभार डाॅ. अशोक नगरकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.