Pimpri : संभाजी बारणे यांच्या व्हिजिटींग कार्ड जमा करण्याच्या छंदची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एमपीसी न्यूज – थेरगावचे रहिवासी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी व्हिजिटींग कार्ड जमविण्याचा आगळा-वेगळा उपक्रम छंद म्हणून केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नुकतीच घेतली. हे संकलित केलेले व्हिजिटिंग कार्ड आणि फोटो हा ऐतिहासिक दस्त असून भविष्यात हा आगळा वेगळा उपक्रम समाजोपयोगी आणि भावी पिढीस प्रेरणादायी ठरेल, अशी माहिती संभाजी बारणे यांनी सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

याविषयी अधिक माहिती देताना संभाजी बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना लोकनेते आण्णासाहेब मगर यांनी 4 मार्च 1970 साली पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी-निगडी ही गावे एकत्र करून केली. शासकीय समितीने 1970 ते 1978 पर्यंत कारभार केल्यानंतर 20 मार्च 1978 साली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. डॉ. श्री. श्री. घारे यांना पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर 19 ऑक्टोबर 1982 रोजी महाराष्ट्र शासनाने नवनगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर केले.

  • यावेळी काही नविन गावे समाविष्ट केली. महानगरपालिकेची पहिली निवडणूक 1986 साली झाली. त्यानंतर 1992, 1997, 2002, 2007, 2012, 2017 साली पंचवार्षिक निवडणुका झाल्या. 1970 ते 2017 या कालावधीत नवनगरपालिका व महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचे व स्विकृत सदस्य, नामनिर्देशित सदस्य तसेच नगरपिता, सदस्य, सभासद अशा विविध प्रकारच्या पदांवर कार्य केलेल्या लोकसेवकांचे व्हिजिटींग कार्डचा संग्रह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बाळासाहेब बारणे यांनी केला आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने 17 मे 2019 रोजी जाहिर केली. तसे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी संभाजी बाळासाहेब बारणे यांना प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे.

‘‘MAXIMUM COLLECTION OF VISITING CARDS OF MUNICIPAL CORPORATION ’’ या नावाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यामध्ये संभाजी बारणे यांनी 1970 ते 2017 या कालावधीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आजी-माजी नगरसेवकांच्या एकूण 1232 व्हिजिटींग कार्ड 768 फोटोग्राफ आणि 244 प्रमाणपत्रांचा संग्रह केला आहे.

  • या उपक्रमाविषयी माहिती देताना संभाजी बारणे यांनी सांगितले की, सामाजिक कार्य करीत असताना काही सदस्यांनी त्यांचे व्हिजिटींग कार्ड संदर्भ म्हणून मला दिले होते. ब-याच दिवसानंतर या व्हिजिटिंग कार्डचे संकलन करण्याचा मनात विचार आला त्यावेळी माझ्याकडे केवळ पाच टक्के व्हिजिटींग कार्ड होते. त्यानंतर संग्रह करण्याबाबत निश्चय करून नगरपालिका, महानगरपालिका स्थापनेपासून आजपर्यंतची सर्व सदस्यांची व्हिजिटींग कार्ड, फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्त मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. यासाठी माझ्या अनेक मित्रांनी, पत्रकारांनी, नगरसेवकांनी मला मोलाचे सहकार्य केले. त्यांनी त्यांच्याकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे असणारी व्हिजिटींग कार्ड्‌स मला देऊन सहकार्य केले. त्यासाठी अनेक लोकसेवकांच्या घरी जावून व्हिजिटिंग कार्ड व फोटो जमा करावे लागले. पुणे विभागीय आयुक्त यांचेकडून 2012 व 2017 साली निवडून आलेल्या सर्व मनपाच्या सदस्यांचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र माहितीचा अधिकार कायदयान्वये मिळविले.

नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये लोकसेवक म्हणून कार्य केलेल्या जुन्या जाणत्या सदस्यांची या उपक्रमामुळे ओळख झाली. ज्यांना कधी मी प्रत्यक्षात भेटलो नव्हतो त्या अनेक ज्येष्ठ सदस्यांना भेटण्याचा उपक्रमामुळे योग आला. यावेळी अनेक सदस्यांनी त्यांच्या माहितीचा व अनुभवाचा अनमोल खजिना शब्दरुपाने व कागदोपत्री मला देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केला. त्याविषयी आगामी काळात लवकरच पुस्तक प्रकाशन करून ती उद्‌बोधक माहिती समाजापुढे मांडण्याचा माझा मानस आहे. मात्र, अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. परंतू त्यांच्या कुटुंबियांनी मला या उपक्रमामध्ये सहकार्य केले.

  • भावी पिढीला या सदस्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळावी यासाठी हे संकलन केले असून देशात अशाप्रकारचा उपक्रम मी पहिल्यांदाच केला असल्यामुळे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. या उपक्रमात मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या अनेक पत्रकार, अधिकारी, नगरसेवक, नगरसेवकांचे कुटुंबिय यांचे मी आभार मानतो व त्यांच्याविषयी आदरयुक्त कृतज्ञता व्यक्त करतो, असेही संभाजी बारणे यांनी सांगितले. हे संकलित केलेले व्हिजिटिंग कार्ड व फोटो हा ऐतिहासिक दस्त असून भविष्यात हा आगळा वेगळा उपक्रम समाजोपयोगी व भावी पिढीस प्रेरणादायी ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.