Pimpri: पिंपळे गुरव येथील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; परिसर ‘सील’

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव परिसरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे आज रात्रीपासून हा परिसर सील करण्यात येणार आहे. तर, पुणे महापालिका हद्दीतील रहिवाशी पण पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या तिघांचेही आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाबाधित 68 सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील आणि शहरातील अशा 120 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 39 जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने बुधवारी (दि. 29) 153 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये पिंपळेगुरव परिसरातील 10 वर्षाच्या मुलाचे आणि 36 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

याशिवाय पुणे महापालिकेच्या सदाशिव पेठ, भवानी पेठ आणि गंजपेठमधील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 35, 48 आणि 80 वयवर्ष असलेल्या पुरुष रुग्णांचा समावेश आहे. तर, आज भोसरी, संभाजीनगर आणि दापोडी परिसरातील आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 170
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 5
    #निगेटीव्ह रुग्ण – 146
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 184
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 252
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 150
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 120
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 67
    # शहरातील कोरोना बाधित दहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 5
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 39
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 14579
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 46173

पिंपळे गुरवचा हा परिसर सील
पिंपळेगुरव येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर-साठ फुटी रोड- भालचंद्र हॉस्पिटल-निलम सुपर मार्केट-गणेश मंदिर-माऊली हॉटेल-श्रीगणेश डेअरी-जयश्री स्वीट्स-तुळजभवानी मंदिरचा परिसर आज मध्यरात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.