Pimpri News: ‘मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल’ अशी धमकी देत रिक्षा चालकाला मारहाण

फिर्यादी यांनी त्याला 'तू इथे बोलू नको, इथून निघून जा' असे सांगितले. त्यावेळी अल्पवयीन साथीदाराने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली.

एमपीसी न्यूज – रिक्षामध्ये मित्रासोबत जेवण करत बसलेल्या रिक्षा चालकाला ‘मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल’ अशी धमकी देत तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता चिंचवड येथील महात्मा फुले नगर येथे घडली.

महबूब फरद शेख (वय 19, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सचिन विलास साळुंखे (वय 24), सागर कैलास साळुंखे (वय 34, दोघे रा. महात्मा फुले नगर,चिंचवड) या दोघांना अटक केली आहे. तर त्याच्या तिस-या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता महात्मा फुले नगरच्या कमानीजवळ रिक्षात बसून मित्रासोबत जेवण करत होते.

त्यावेळी आरोपींचा अल्पवयीन साथीदार तिथे आला. त्याने विनाकारण रिक्षात डोकावून ‘मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल’ अशी धमकी दिली.

त्यावर फिर्यादी यांनी त्याला ‘तू इथे बोलू नको, इथून निघून जा’ असे सांगितले. त्यावेळी अल्पवयीन साथीदाराने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांना सुरीने आणि हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

यामध्ये फिर्यादी शेख जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी 8 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.