Pimpri: कॅम्पातील गर्दीवरील नियंत्रणासाठी महापालिकेने बंद केलेला रस्ता नागरिकांनी परस्पर केला खुला

महापालिका पुन्हा बंद करणार रस्ता, Pimpri: The road closed by the Municipal Corporation to control the crowd in the camp was reopened by the citizens

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने बंद केलेले रस्ते नागरिकांनी खुले केले आहेत. आता पुन्हा महापालिका पोलिसांच्या सहाय्याने हे रस्ते बंद करणार आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून महापालिका रस्ते बंद करत आहे. नागरिकांनी स्वत:हून रस्ते खुले करु नयेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निर्बंध अशत: शिथिल केल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूक, गर्दी वाढली होती. या गर्दीवर निर्बंध आणणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेने मंगळवारी (दि.12) मार्केट, शगुन चौकातील रस्ते पत्रे लावून बंद केले होते. बाहेरील नागरिकांना कॅम्पात जावू दिले जात नव्हते. पिंपरी कॅम्पात कोरोनाचा रुग्ण सापडला नसून केवळ गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने रस्ते बंद केले होते.

नागरिकांनी आज (शनिवारी) पत्रे काढून बंद केलेले रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. रस्त्यांच्या बाजुला बसून भाजी विक्री सुरु झाली. यामुळे गर्दी वाढू लागली. त्यानंतर आता महापालिका पुन्हा हे रस्ते बंद करणार आहे. याबाबत पोलिसांनाही सूचना केल्या जाणार असल्याचे महापालिका अधिका-यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रस्ते बंद केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी  महापालिकेने बंद केलेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करु नयेत असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.