Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत- आ. महेश लांडगे

The state government should not start schools on the backdrop of corona-Mahesh Landage

आमदार लांडगे यांचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले निवेदन
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह राज्यात कोविड-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिणामी, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय शाळा किंवा महाविद्यालये सुरू करु नयेत, अशी पालकांची मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत आमदार लांडगे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम शाळा-महाविद्यालये तत्काळ बंद केली, आता त्या पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा लागले.

कारण, इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक महागात पडली आहे. इस्त्राईलमधील १२० शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.

अवघ्या तीन आठवड्यात या शाळांमधील ३४७ विद्यार्थी व शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि संभाव्य धोका ओळखून सरकारने तत्काळ सर्व शाळा बंद केल्या.

आज सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याची वेळ ईस्त्राईलवर आली आहे. त्यामुळे तेथील पालक चिंताग्रस्त असून, प्रशासनाच्या निर्णयावर संतापले आहेत.

शाळा-महाविद्यालये सुरू केल्यास काय परिणाम होतील, याचा दाखला ईस्त्राईलच्या रुपाने बोलका आहे. शाळा सुरू करुन पुन्हा बंद करण्याची वेळ येवू नये.

दुसरीकडे, कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे रोजगार आणि नोकरी गेली आहे. दोन महिन्यांचा पगार अनेकांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता पालकांना आहे.

अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांनी शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे. तसेच, व्हर्च्युअल वर्ग सुरू करुन मोबाईल- टॅब खरेदीसाठी सूचना केल्या जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, डोनेशन अथवा विकास निधीबाबत पालकांना शाळा प्रशासनाने वेठीस धरू नये, याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने शाळा सुरू करुन पालकांची चिंता वाढवू नये. सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही पिंपरी-चिंचवडमधील एकही शाळा भारतीय जनता पार्टी सुरु होवू देणार नाही.

अगोदर संसद, विधानसभा, शासकीय सर्व कार्यालये सुरू करा. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आमदार लांडगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.