BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शेतात पाईपलाईन करण्यासाठी त्यांनी चोरला पाईपने भरलेला टेम्पो

टेम्पोचालकाचे अपहरण; तिघांना अटक, गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – दुष्काळ कोणाला काय करायला लावेल, हे सांगता येत नाही. गावी दुष्काळ पडल्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली. शेतात पाईपलाईन करायची म्हणून तिघांनी मिळून पाइपने भरलेला टेम्पो चोरून नेला. टेम्पोचालकाचे अपहरण करून पाईपने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 11 लाख 29 हजार 512 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

अमोल विक्रम मोरे (वय 20, रा. गणेशनगर, येरवडा), समाधान त्रिंबक दौंड (वय 23, रा. गणेशनगर, येरवडा),आणि संदीप राजेंद्र मोरे (वय 28, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे त्यांना आर्थिक अडचण भासू लागली. त्यांना शेतात पाईपलाईन करायची आहे. यासाठी तिघांनी मिळून पाईपने भरलेला टेम्पो चोरण्याचे ठरवले. संदीप मोरे सध्या शेलपिंपळगाव येथे शिक्रापूर रोडवर राहतो. त्याच्या घरासमोर अनेक वाहने थांबतात.

सहा जून रोजी तिघांनी मिळून फिनोलेक्स पाईपने भरलेला टेम्पो हेरला. टेम्पोवर भास्कर श्रीपतराव लांडगे हे चालक होते. तिन्ही आरोपींनी रात्री पावणेबाराच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर टेम्पो अडवला. आम्ही फायनान्सचे लोक आहोत. तुमच्या गाडीचा हप्ता थकलेला आहे, असे सांगून दोघांनी भास्कर यांना त्यांच्या दुचाकीवर नेले. तिसऱ्या आरोपीने पाइपने भरलेला टेम्पो सरळ उस्मानाबादला नेला. टेम्पोचालक भास्कर यांना दोघांनी दिघी येथे सोडले. त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतला. याबाबत भास्कर यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

  • चाकण पोलिसांसह पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना या गुन्ह्यातील संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार येरवडा बीडी चाळ भागात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पाइपने भरलेला टेम्पो त्यांच्या मूळ गावी येरमाळा व वाशी येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व दळवेवाडी येथे जाऊन टाटा टेम्पो व त्यामधील नऊशे फिनोलेक्स पाईप असा एकूण 11 लाख 29 हजार 512 रुपयांचा ऐवज जप्त केला.

चोरलेल्या पाईपपैकी काही पाईप आरोपी त्यांच्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी वापरणार होते. तर राहिलेले पाईप आणि टेम्पो विकणार होते. मात्र पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत त्यांचा कट उधळून लावला.

  • ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, राजेंद्र शेटे, अमित गायकवाड, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सचिन मोरे, सूनील चौधरी, प्रमोद केळकर यांच्या पथकाने केली.
.