Pimpri: महापालिका अर्थसंकल्पाला महासभेची एकमताने मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षांचा 6,183 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला विशेष महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी आज (शनिवारी) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी अर्थसंकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. त्याला नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले.

  • महापालिकेचा सन 2018-19 चे सुधारित आणि 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी स्थायी समिती समोर सादर केला होता. स्थायी समितीने आयुक्तांच्या अर्थसंकल्पात सुधारणा करत 267 कोटी रुपयांच्या उपसूचनांचा समावेश करत अर्थसंकल्पाची अंतिम मान्यतेसाठी 28 फेब्रुवारी रोजी महासभेकडे शिफारस केली होती.

तथापि, 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाला महासभेची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबाजवणीला सुरुवात केली होती. त्यात कोणताही फेरफार अथवा बदल न करण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी घेतला होता.

  • स्थायी समिती सदस्यांनी मांडलेल्या 267 कोटी रुपयांच्या उपसूचना रद्द करत आयुक्तांचा मूळ अर्थसंकल्प जशाच तसे अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला होता.

आज झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी अर्थसंकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. आचारसंहिता असल्याने आयुक्तांनी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कोणतीही उपसूचना न घेता एकमताने मंजुरी देण्याची विनंती केली. त्याला नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर जाधव यांनी अर्थसंकल्प मंजूर झाल्याची घोषणा केली.

  • दरम्यान, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु असल्याने त्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याची औपचारिकता पूर्ण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.