Pimpri: महापालिकेची आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने होणार -अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने घेतली जाईल. मुंबई सोडून उर्वरिवत महापालिकांची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याचा विचार सुरु आहे. पिंपरी महापालिकेची एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होईल, असे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी अजित पवार यांनी आज संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन वर्षांवर आली आहे. 2022 मध्ये फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग ठेवायचे की वार्ड पद्धतीने घ्यायची असे अजितदादांनी नगरसेवकांना विचारले. त्यावर तत्काळ सर्व आजी-माजी नगरसेवकांनी द्विसदस्यी पद्धतीने (वॉर्ड) घेण्याची मागणी केली. मुंबई महापालिका सोडून द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याचा विचार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित निर्णय घेतील, असे दादांनी सांगितले.

तत्कालीन सत्ताधारी भाजपने फेब्रुवारी 2017 मध्ये झालेली महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेतली. चार जणांचा प्रभाग केला. प्रभाग रचना आपल्या सोयीची करुन घेतली. प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. सोयीची प्रभाग रचना केल्यानेच भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादीचा आहे. आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार आहे. या पक्षांच्या नगरसेवकांची द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) निवडणूक घेण्याची मागणी आहे. त्यामुळे आगामी महापालिकेची निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.