Pimpri : प्रत्येक गोष्टीतील चांगलं घेऊन पुढे जाण्याचा मार्ग राज्यघटना दाखवते – रमेश पतंगे

पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना आदरांजली

एमपीसी न्यूज – प्रत्येक व्यक्तीमधील, पुस्तकांमधील किंवा जीवनात घडणा-या गोष्टीतील सगळंच आपल्याला आवडेल असं होत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतील चांगलं घेऊन त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याची दिशा भारतीय राज्यघटना दाखवते. असे मत लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.
क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मुक्तांगण लोककला व्यासपीठ येथे आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना लेखक रमेश पतंगे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे विभागाचे संघसंचालक संभाजी गवारे, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष . ऍड. सुनील कडुसकर, गुरुकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उद्योजक मिलिंद कांबळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे, विनायक थोरात, अशोक पारखी, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

रमेश पतंगे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका समाजाचं प्रतिनिधित्व केलं असलं तरी त्यांचे विचार आणि कार्य संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आणि विचार करायला भाग पडणारे होते. भारताची राज्य घटना लिहिताना त्यांनी विशिष्ट समाजाचा विचार केला नाही, तर संपूर्ण राष्ट्राचा विचार केला. भारतातील प्रत्येक घटकाला राज्यघटनेच्या घटनात्मक तरतुदींनी बांधून ठेवलं आहे. यामुळे आजच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व क्षेत्राची वाटचाल व्यवस्थित होत आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रत्येकाच्या आचार, विचार, अभिव्यक्तीला स्वातंत्र्य प्रदान केले आहे. प्रत्येकाला संधीची आणि दर्जाची समानता दिली आहे. यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा उत्कर्ष होत आहे.”

गिरीश प्रभुणे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एका विशिष्ट समाजात बांधून ठेवलं जात आहे. त्यांचे विचार आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा जागर व्हायला हवा. विचारातून डॉ. बाबासाहेब घराघरात पोहोचायला हवेत. केवळ मनात बाबासाहेब असून चालणार नाही. तर प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये सुद्धा बाबासाहेब त्यांच्या विचारांच्या माध्यमातून असायला हवेत. त्यांनी सांगितलेली आदर्श नीती तत्व, मार्गदर्शक मूल्ये प्रत्येकाने जोपासायला हवीत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसाराम कसबे यांनी केले. गतीराम भोईर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.