BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे काम लवकरच होणार सुरु

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आले आहे. मेट्रोचा साडेचार किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार झाला आहे. त्यावर रूळ टाकण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे रूळ नागपूरहुन आणण्यात येत आहेत.

जगभरातल्या अत्याधुनिक रेल्वे प्रणाली वापरत असलेले रूळ पुणे मेट्रोसाठी वापरण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोसाठी 18 मीटर व 25 मीटर या लांबीमध्ये रेल्वे रूळ वापरण्यात येणार आहेत. हे रेल्वे रूळ अत्याधुनिक फ्लॅश बट आणि अॅल्युमिनियम थर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. जोडलेल्या रेल्वे रुळांचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक मशीनद्वारे टेस्टिंग केले जाणार आहे. रुळांचा वरचा भाग विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे कठीण केलेला असल्याने रुळांची झीज कमी होऊन रुळांचे आयुष्य वाढेल.

  • पुणे मेट्रोचा उन्नत आणि भूमिगत मार्गाचा ट्रॅक बॅलास्ट लेस या प्रकारातला आहे. सामान्यतः रेल्वे प्रणालीत रेल्वे रूळ दगडाच्या खडीवर (बॅलास्ट) टाकण्यात येतात. ज्यामुळे रेल्वे रुळावरून कोच जाताना रेल्वे रूळ खाली दाबले जाऊन कुशनसारखा परिणाम साधता येतो.

बॅलास्ट सहित (Ballasted) रुळांचे अनेक तोटे असल्यामुळे पुणे मेट्रोमध्ये बॅलास्ट विरहीत रूळ टाकण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांच्या आरामदायकतेत वाढ होईल. त्याचबरोबर या ट्रॅकसाठी कमीत कमी देखभालीची गरज, पर्यावरणास अनुकूल, प्रदूषण मुक्त, रायडींग कम्फर्ट चांगला, रेल्वे रुळांचे आयुष्य वाढवण्यासाठी मदतगार ठरणारे हे रेल्वे रूळ आहेत.

  • पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण 9 हजार मेट्रिक टन रुळांची आवश्यकता आहे. रिच एक आणि दोनच्या प्राथमिक सेक्शनसाठी एकूण 3 हजार मेट्रिक टन रूळ लागणार आहेत. नागपूरहून 600 मेट्रिक टन वजनाचे रूळ ;पुणे मेट्रोसाठी येणार आहेत. हे रूळ स्वित्झर्लंडच्या कंपनीने त्यांच्या सायबेरियातील कारखान्यात बनविले आहेत.

वेळेची बचत व्हावी म्हणून नागपूर मेट्रोचे अतिरिक्त रेल्वे रूळ पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मागविण्यात येत आहेत. नागपूरहून कंटेनरच्या माध्यमातून रूळ पुण्याला आणले जातील. रूळ येताच रूळ बसवण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे.

.