Pimpri: कामगारांच्या प्रश्नांना संसदेत फोडली वाचा -खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज -मागील पाच वर्षांमध्ये विविध संसदीय आयुधांचा वापर करून कामगारांच्या विविध प्रश्नांना देशाच्या संसदेत वाचा फोडली. यापुढे देखील कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन, त्यांचे प्रश्न संसदेत मांडून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी कामगारांना दिली.

प्रीमियर एम्प्लॉईज युनियन आणि श्रमिक एकता महासंघाची आठवी सर्वसाधारण सभा चिंचवड येथील एसकेएफ सभागृहात पार पडली. या सभेला संबोधित करताना खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिंदे, शरद जाधव, सचिन आल्हाट, संतोष कदम, भालचंद्र माळी, कृष्णा धडस, सुभाष पाटील, अब्दुल वारीस, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

  • यावेळी खासदार बारणे म्हणाले, नागरिकांनी विश्वास दाखवत मला देशाच्या संसदेत प्रश्न मांडण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करून मी देशात सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून विक्रम केला. कामगारांच्या प्रश्नांना मी सातत्याने प्राथमिकता दिली. अनिष्ट गोष्टींना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड शहर हे कामगारांचे शहर आहे. कष्टक-यांची नगरी म्हणून या शहराचा जगभर नावलौकिक आहे. देशातील कामगार जगला तर देश जगणार आहे. त्यामुळे कष्टकरी, कामगारांच्या मागे उभे राहत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कामगारांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी कंपनी प्रशासनाशी देखील चर्चा केली आहे. यापुढे देखील कामगारांच्या बाजूने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.

कामगारांचे प्रश्न समजून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रयत्न केले आहेत. येत्या निवडणुकीत श्रीरंग बारणेच विजय होतील, असा विश्वास कामगारांनी दाखवला. तसेच कामगारांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करावा. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग आहे. देशभरातून या भागात कामगार कामासाठी आले आहेत. त्यामुळे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा मिळावा, यांसारख्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी देखील कामगारांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.