Pimpri : उद्योगनगरीत चार वाहनांची चोरी; वाहनचालकासह मालकांमध्ये घबराट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकींची चोरी झाली आहे. एक लाख नऊ हजार रुपये किमतीची वाहने चोरी झाल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनचोरीच्या या प्रकारांमुळे वाहनचालक आणि मालकांमध्ये घबराट आहे.

पहिल्या प्रकरणात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराची दुचाकी चोरी करून नेली. हा प्रकार चाकण ते तळेगाव रस्त्यावरील वाघजाईनगरच्या हद्दीत मंगळवारी (दि. 17) रात्री 9 ते बुधवारी (दि. 18) सकाळी सहाच्या दरम्यान घडला.

याप्रकरणी लतीफ बालमभाई पठाण (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पठाण बिगारी असून, मजुरीचे काम करतात. ते मंगळवारी रात्री वाघजाईनगरच्या हद्दीतील फोर्जिंग कंपनीजवळ रस्त्याच्या कडेला झोपले होते. त्यावेळी त्यांनी तेथे त्यांची 11 हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात चेतन दिलीप पाटील (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 50 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार प्रकार विजयनगर, काळेवाडी येथे 16 डिसेंबर रोजी घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या प्रकरणात श्रीशैल नागनाथ कोळी (वय 24, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोळी यांनी त्यांची 28 हजार रुपये किमतीची दुचाकी दुकानाबाहेरील जागेत पार्क केली होती. त्यानंतर फिर्यादी कोळी स्वयंपाक करण्याच्या गडबडीत होते. जेवण झाल्यानंतर मित्र राजकुमार प्रकाश मेहेत्रे याला रात्री दुकानात झोपण्याचे सांगून फिर्यादी कोळी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दुकानाबाहेर त्यांची दुचाकी दुकानाबाहेर दिसून आली नाही. ही घटना वाकड येथे बुधवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या प्रकरणात सुमित राजू कांबळे (वय 27, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. ही घटना चिचवड येथे शुक्रवारी (दि. 20) रात्री 11 ते शनिवारी (दि. 21) पहाटे पाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.