Pimpri : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पार्क केलेल्या कारमधून दीड लाखांच्या वस्तूंची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातून पार्क केलेल्या कारमधून लॅपटॉप, कारटेप, स्टेपनी, टायर असा एकूण एक लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 25) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निखिल अनिल दांदडे (वय 30, रा. यमुनानगर, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल यांनी त्यांची कार (एम एच 14 / डी एच 2002) रविवारी (दि. 22) रात्री साडेआठच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी येथील हॉटेल तिरंगा समोर पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी ड्रायवर बाजूची मागची काच फोडून कारमधून लॅपटॉप बॅग, लॅपटॉप, हेडफोन व अन्य साहित्य असा एकूण 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निखिल त्यांचे काम संपवून कारजवळ आले असता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

मनोज सिद्धेश्वर मोहिते (वय 36, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज यांनी रविवारी (दि. 22) रात्री सातच्या सुमारास त्यांची कार (एम एच 14 / जी एन 9713) तळेगाव दाभाडे येथील मीरा सोसायटीसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून कारमधून टेपरेकॉर्डर सिस्टीम, व्हील कॅप स्टेपनी, टायर असा एकूण 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

पंजाब तेजराव वानखेडे (वय 29, रा. नेरे दत्तवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंजाब यांनी त्यांचा टेम्पो ट्रॅव्हल्स (एम एच 14 / जी यु 0290) शनिवारी (दि. 21) सायंकाळी सहा वाजता लक्ष्मी चौक हिंजवडी येथे आदिती हॉटेलसमोर पार्क केला. रात्री अज्ञात चोरट्यांनी टेम्पोची पुढच्या बाजूची 10 हजारांची दोन्ही चाके काढून नेली. रविवारी सकाळी पाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.