Pimpri: शहरवासीयांना मे मध्येही पाणीटंचाई भासणार नाही; धरणात 44 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटाचा सामना करत असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना यंदा पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहरवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा आहे. आजमितिला धरणात 44.53 टक्के  पाणी असून 31 जुलैपर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. त्यामुळे मे महिन्यात देखील नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे. दरम्यान, गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 28.93 टक्के पाणीसाठा होता.

शहरातील नागरिकांना समान, पुरेसे व पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी पिंपरी महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. या निर्णयाला पाच महिने पूर्ण झाली आहेत. महापालिकेने पाच महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही.

सध्या कोरोनाचे सावटाखाली नागरिकांना लॉकडाऊनचे जीवन जगावे लागत आहे. कारखाने बंद आहेत. सर्वजण घरात बसून आहेत. त्यात उन्हाळ्याची भर पडली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. शिवाय, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत आहे. पवना धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही.

पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे समन्याय पद्धतीने पाणी वितरण केले जात आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने मुबलक पाणी नागरिकांना मिळत आहे.  सध्या प्रतिदिन 480 ते 490 एमएलडी पाणी उचलत आहोत. याशिवाय एमआयडीसीकडून 30 एमलडी  पाणी घेतले जात आहे. त्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना मिळत आहे. नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी आहे”.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल म्हणाले, ”पवना धरणात आजच्या तारखेला 44.53 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 28.93 टक्के पाणीसाठा होता. लॉकडाउनमुळे नागरिक घरी आहेत. त्यात उन्हाळा असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. त्यांच्यासाठी पुरेसे पाणी गरजेचे आहे. नागरिकांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही.

सध्या उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांच्याकडून पाण्याची मागणी कमी झाली आहे.  मात्र, घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. ऐरवी 850 एमएलडी होणारा दररोजचा विसर्ग आता 900 एमएलडी केला आहे. सुमारे 20 टक्के जादा पाणी सोडले जात आहे. शहरासह ग्रामीण भागाला याचा फायदा होत आहे. धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like