Pimpri : बिबट्याचा ‘हा’ व्हिडिओ पिंपरी-चिंचवडमधील नाही तर हैदराबादच्या काटेदान परिसरातील!

Pimpri: This leopard video is not from Pimpri-Chinchwad but from Katedan area of Hyderabad!

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड आणि परिसरात सोशल मीडियावर काल (गुरुवार) पासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एक बिबट्या ग्रेड सेपरेटरमध्ये आढळून आला आहे. हा ग्रेडसेपरेटर पिंपरी येथील असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या व्हिडिओचा ‘एमपीसी न्यूज’ टीमने शोध घेतला असता व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडिओ पिंपरी येथील नसून हैदराबाद शहरातील काटेदान परिसरातील असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या या बिबट्याने हैदराबादमध्ये दहशत निर्माण केली. काटेदान येथील एका ग्रेडसेपरेटरमध्ये हा बिबट्या बसला असून त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याला शोधण्यासाठी नेहरू झूलॉजीकल पार्कचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.

ड्रोन आणि ट्रॅप कॅमेरे देखील तैनात केले आहेत. काही काळ रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. परंतु अद्याप बिबट्या सापडला नाही. जवळपासच्या झाडीमध्ये तो लपून बसल्याचा संशय आहे. काटेदानजवळ नरसिंगी हे वन क्षेत्र असून तेथून हा बिबट्या आला असावा, असा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या बिबट्याने आतापर्यंत एका ट्रक चालकावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ग्रेड सेपरेटर जुना पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरसारखा दिसत आहे. मात्र, त्याच्या वरच्या बाजूला असलेले रेल्वेची ओव्हरहेड वायर, इमारत असे साधर्म्य पिंपरीमध्ये कुठेही आढळत नाही. शिवाय व्हिडिओमध्ये ऐकू येणारे लोकांचे संभाषण देखील मराठी भाषेतील नाही. त्यामुळे या व्हिडिओचा ‘एमपीसी न्यूज’ टीमने शोध घेतला असता तो व्हिडिओ हैद्राबाद येथील काटेदान येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पिंपरी परिसरात असा काही प्रकार नसल्याचे पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले आहे.

मुंबई मिररने अपलोड केलेला हा हैदराबाद येथील बिबट्याचा व्हिडिओ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.