Pimpri : ‘तो’ मॉकड्रीलचा व्हिडिओ कर्नाळा ‘डी मार्ट’चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ सोबत ‘हा व्हिडिओ चिंचवड येथील डी मार्टचा असून डी मार्टमध्ये बॉम्ब ठेवताना आतंकवादी पकडला’ अशा प्रकारचा मेसेज थैमान घालत आहे. मात्र, हा व्हिडिओ चिंचवडमधील नसून पालघरमधील कर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी मार्टचा आहे. पालघर पोलिसांनी येथे मॉकड्रिल केले आहे.

पालघरमधील अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी (दि. 14) दुपारी पाच वाजता मॉक ड्रिल केले. अर्नाळा येथील डी मार्टमध्ये मॉक ड्रिलचा सराव घेण्यात आला. त्यावेळी 3 अधिकारी व 25 कर्मचारी हजर होते. या करवाईमध्ये अर्नाळा पोलीस, आरसीपी, क्यूआरटी आदींनी सहभाग घेतला. यामध्ये पोलिसांनी डी मार्टमधून एका दहशतवाद्याला पकडले आहे. पकडलेल्या व्यक्तीला डी मार्टमधून बाहेर आणून पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेतानाचे दृश्य आहे.

  • दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात हा व्हिडिओ सोशल मीडियावर वा-यासारखा पसरला आहे. गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या व्हिडिओला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले आहे.

आपल्या जवळच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने नागरिकांनी एक प्रकारे भीती बाळगल्याचे वातावरण सोशल मीडियावर पसरले आहे. मात्र, हा व्हिडिओ चिंचवड मधील नसून पालघरमधील आहे. तसेच पालघर येथे पोलिसांनी मॉकड्रील केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून वेळोवेळी अशा प्रकारचा सराव करण्यात येतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.