Pimpri : विनाकारण हिंडणाऱ्यांनो, आता तरी सुधारा!; शहरातील अंतर्गत रस्त्यावर नागरिकांचा बेफिकीरपणे वावर

एमपीसी न्यूज – ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका आणि आरोग्य विभाग त्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या करीत आहे. अशा वातावरणात देखील शहरातील काही अंतर्गत रस्त्यावर नागरिक बेफिकीरपणे फिरत आहेत. त्यामुळे ‘विनाकारण हिंडणाऱ्यांनो, आता तरी सुधारा रे…!’अशी म्हणायची वेळ आली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही नागरिक कसलीही चिंता न बाळगता बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना आढळून येतात. पोलिसांनी चौकाचौकात नाकाबंदी, शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट तयार केल्या आहेत.

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे साडेपाच हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरात राहणं गरजेचं आहे. नागरिक घरात राहिले तर कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्षच संपर्क कमी करणे हा सध्यातरी परिणामकारक उपाय प्रशासनासमोर आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वारंवार घरात राहण्याचे आवाहन केले जाते. पण त्या आवाहनाला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. ही बाब नागरिकांसाठी धोक्याची आहे.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून बाधित रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कात असलेल्यांची चाचणी तसेच परिसरातील अन्य नागरिकांची तापसणी केली जात आहे. प्रशासन युद्ध पातळीवर कोरोनाशी लढत आहे. मात्र, नागरिक गाफील राहून जाणीवपूर्वक घराबाहेर पडत आहेत.

आकडा वाढला की प्रशासनाला बोल लावायचे आणि आपण मात्र घराबाहेर फिरायचं. असं करणाऱ्यांनो आता तरी सुधरा. कारण कोरोना कुणालाही सोडत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.