Pimpri: Pimpri: भाजपाकडून शरद पवार यांना ‘जय श्री राम’; महापौरांच्या उपस्थितीत पाठविली पत्रे

Thousands of letters written 'Jai Shri Ram' to Sharad Pawar from the city :महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सांगवीतील पोस्टातून 'जय श्री राम' लिहिलेली पत्रे श्री. पवार यांना पाठविण्यात आली.

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘जय श्री राम’ लिहिलेली 10 लाख पत्रे पाठविणार आहे. राज्यभरातून येत्या दोन दिवसात ही पत्रे पोहचविण्याचे नियोजन ‘भाजयुमो’ने केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातूनही ही पत्रे पाठविण्यात आली.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सांगवीतील पोस्टातून ‘जय श्री राम’ लिहिलेली पत्रे श्री. पवार यांना पाठविण्यात आली.

यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा दिल्या.

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या बद्दल टिप्पणी करताना शरद पवार यांनी ‘राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?’, असे म्हटले होते. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यातील भाजपचे 10 लाख कार्यकर्ते पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पत्रे पाठविणार आहेत.

यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील ‘भाजयुमो’ची यंत्रणा कार्यरत झाली आहे. मुंबई, ठाणे या परिसरातून काल या उपक्रमाची सुरवात झाली आहे.

त्याच मोहिमेला धरून आज पिंपरी-चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने शहरात ही मोहीम राबविण्यात आली. महापौर उषा माई ढोरे यांच्या उपस्थितीत शरद पवार यांना पत्रे पाठविण्यात आली.

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सदस्य जवाहर ढोरे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष साई कोंढरे, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव, अभिजित बागुल, शुभम कांबळे, राजेश राज पुरोहित, सुमित घाटे, प्रकाश चौधरी, उदय गायकवाड, शिवराज लांडगे, अतुल राक्षे, भूषण गायके हे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.