Pimpri: तेरा लाख मतदार ठरविणार शहरातील तीन आमदार; निवडणूक विभागाकडून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघांत तेरा लाख 618 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार सुमारे 6 लाख 97 हजार 34 तर महिला मतदार सुमारे 6 लाख 3 हजार 525 आहेत. सुमारे 59 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे मतदार शहरातील तीन आमदार ठरविणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने नुकतीच अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 36 हजार नवमतदारांची नावे वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदार वगळण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 7 हजार 454 पुरुष, 6 हजार 641 स्त्री व इतर 1 असे 14 हजार 96 मतदार वाढले आहेत. चिंचवडमध्ये दोन लाख 75 हजार 486 पुरुष तर दोन लाख 41 हजार 318 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 16 हजार 836 मतदार आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 18 हजार 835 मतदार वाढले आहेत. यामध्ये 10 हजार 73 पुरुष तर 8 हजार 754 स्त्री व इतर 8 अशी नवमतदारांची नोंद झाली आहे. भोसरीत दोन लाख 36 हजार 853 पुरुष तर एक लाख 95 हजार 640 महिला आणि 22 इतर असे चार लाख 32 हजार 515 मतदार आहेत.

लोकसभेनंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघात 1 हजार 829 पुरुष, 1 हजार 698 स्त्री असे 3 हजार 527 नवमतदार वाढले आहेत. पिंपरीत एक लाख 84 हजार 713 पुरुष तर एक लाख 66 हजार 567 महिला आणि इतर 6 असे एकूण तीन लाख 51 हजार 285 मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like