Pimpri : चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

Pimpri: Three killed in four separate accidents

एमपीसी न्यूज – तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चौथ्या अपघातात दोन कारची धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शनिवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक वाय व्ही शिरसाठ यांनी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ही घटना 12 मे रोजी रात्री आठ वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर काळभोरनगर येथे घडली आहे. एका अज्ञात रिक्षा चालकाने बेदरकारपणे रिक्षा चालवून अनोळखी महिलेला पाठीमागून धडक दिली. त्यात त्या महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता रिक्षा चालक पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दुसऱ्या प्रकरणात नेताजी हरीचंद्र क्षीरसागर (वय 25, रा. हिंजवडी) यांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेताजी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता विनोदे नगर, हिंजवडी येथे सार्वजनिक रस्त्यावर घडली. फिर्यादी यांचे वडील हरीचंद्र मरीबा क्षीरसागर (वय 62) हे पायी चालत कामावर जात होते. त्यावेळी एका अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात हरीचंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आरोपी दुचाकीस्वार अपघाताची माहिती न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या प्रकरणात नागेश्वर निराकार मोहंती (वय 26, रा. नवी सांगवी. मूळ रा. ओरिसा) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / एच जी 1654 या डंपरवरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे. नागेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजता पिंपळे गुरव येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. नागेश्वर यांचा एक मित्र नागेश्वर यांची दुचाकी घेऊन जात होता. आरोपी डंपर चालकाने डंपर भरधाव वेगाने चालवून नागेश्वर यांच्या मित्राला पिंपळे सौदागर वरून मयुरीनगरकडे जाणाऱ्या वळणावर जोरात धडक दिली. त्यात नागेश्वर यांचा मित्र गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची चौथी घटना शनिवारी (दि. 16) दुपारी तीन वाजता दत्त मंदिर रोड, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी अमर सुधाकर राक्षे (वय 28, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नरसिंग धनाजी आयनिले (वय 30, रा. रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नरसिंग याने त्याच्या एम एच 14 / एच डब्ल्यू 3207 या कारने फिर्यादी राक्षे यांच्या एम एच 14 / ई वाय 3138 या कारला जोरदार धडक दिली. त्यात राक्षे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1