Pimpri: मोशी, मोहननगर येथील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, दिवसभरात नवीन 12 रुग्ण; ‘हा’ परिसर सील

कोरोना बाधितांचा आकडा 156 वर; 63 जण कोरोनामुक्त, सात जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, मोहननगर येथील तिघांचे आणि पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार सुरु असलेल्या एक महिलेचे अशा चार जणांचे आज (बुधवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, आज सकाळीच मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड आणि पुण्यातील एक अशा आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 12 नवीन रुग्णांची भर पडली आहे. मोशी, मोहननगर, काळेवाडीतील काही परिसर सील करण्यात आला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने मंगळवारी (दि. 5) 204 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये मोशी, मोहननगर येथील 33, 33, 52 वर्षीय पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, पुणे, येरवडा येथील 48 वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सिंहगड येथील रहिवासी पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असलेला एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले आहे.

10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 156 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महापालिका रुग्णालयात कोरोना बाधित सक्रिय 73 रुग्णांवर आणि शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहराबाहेरीलही नऊ रुग्णांवर पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील 60 आणि शहराबाहेरील 3 असे 63 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका रुग्णाचा वायसीएम रुग्णालयात अशा सात जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 76
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 12
    #निगेटीव्ह रुग्ण – 194
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 75
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 158
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 195
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 156
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 73
    # शहरातील कोरोना बाधित नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 6
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 63
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 18985
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 56721

मोशी, मोहननगर, काळेवाडीतील ‘हा’ परिसर ‘सील’!
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मोशीतील (वुड्सव्हिले सोसायटी बॉर्डर-वुड्सव्हिले रोड-ऑफीस-साई फ्रॅब्रोटेक-हॉटेल शेअरिंग स्पून-आर्या हॉस्पीटल-डीपी रोड) मोहननगर चिंचवड येथील (श्रीराम सुपर मार्केट-श्रीराम मेडिकल शॉप-चौक-टाटा मोटर्स सर्व्हीसिंग सेंटर-वसंत इंडस्ट्रीज-चिखली कस्पटेवस्ती बीरटी टेल्को रोड-जम्बो किंग हॉटेल-एचडीएफसी बँक एटीएम-राष्ट्रमाता जिजाऊ मंगल कार्यालय) आणि काळेवाडीतील (काळेवाडी फाटा-भारस गॅस-सेंट अल्फोन्सो स्कूल-फेडरल बँक-मदर तेरसा फ्लायओव्हर-पवना नदी-काळेवाडी पिंपरी पुल-सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक-पोलीच चौक-काळेवाडी फाटा) हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.