Pimpri: शहरात तीन अद्यावत स्पर्धा परीक्षा केंद्र होणार, महागड्या आजारावरील उपचारांसाठी मिळणार 50 हजार रुपये

नवीन योजना सुचवित स्थायी समितीची अर्थसंकल्पाला मंजुरी, महासभेकडे शिफारस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात ‘युपीएससी’ आणि ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत स्पर्धा परीक्षा केंद्र, डिजीटल लायब्ररी उभारण्यात येणार आहे. ‘पद्मविभूषण सुषमा स्वराज” जन आरोग्य योजना केली आहे. या योजनेअंतर्गत हृदयरोग, कर्करोग, किडनी प्रत्यारोपण या महागड्या उपचाराकरिता 50 हजार रुपयांची मदत रुग्णाला केली जाणार आहे. अर्थसंकल्पात या नवीन योजनांचा अंतर्भाव करत कोणतीही वाढ आणि घट न करता प्रशासनाच्या 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पाला स्थायी समितीने आज (गुरुवारी) मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे. सहा मूळ उपसूचना दिल्या असून त्यामध्ये दहा उपउपसूचनांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन कामांना प्रशासनाच्या अर्थसंकल्पातूनच तरतूद वर्गीकरण केली जाणार आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प 17 फेब्रुवारी रोजी विशेष सभेत स्थायी समितीला सादर केला होता. त्यानंतर स्थायी समितीने अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी विशेष सभा दहा दिवस तहकूब केली होती. ही तहकूब सभा आज (गुरुवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अर्थसंकल्पात स्थायी समितीने रस्त्यांसह विविध नवीन कामे सूचविली आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड, भोसरी मतदारसंघात युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अद्यावत सुसज्ज अभ्यासिका आणि डिजिटल लायब्ररी करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गोरगरीबांना महागड्या आजारांवर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा घेण्याकरिता महापालिकेमार्फत ”पद्मविभूषण सुषमा स्वराज” जन आरोग्य योजना राबविली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत हृदयरोग, कर्करोग, किडनी प्रत्यारोपण या महागड्या उपचाराकरिता 50 हजार रुपयांची मदत रुग्णाला केली जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एक लाखाच्या आतील उत्पन्न, शहरातील रहिवाशी, आधारकार्ड, कुटुंबाचे एकत्रित छायाचित्र आणि 200 रुपये शुल्क आकारुन या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना वैद्यकीय औषधोपचार मिळण्यास मदत होईल. धर्मदाय न्यासाकडे नोंदणीकृत रुग्णालयांनाच ही योजना लागू केली जाणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उद्यानात जगातील सात आश्चर्यांची प्रतिकृती असलेले थीम पार्क गार्डन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये प्रस्तावीत केले असून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चिंचवड येथे योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी अद्यावत योगा भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी प्रस्तावित तर एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पिंपळेगुरव येथे 7-डी थियेटर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटीची मान्यता तर 60 लाखाची तरतूद केली आहे. पिंपळेसौदागर येथे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती होण्याकरिता ‘चिल्ड्रेन्स ट्राफिक’ पार्क तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपये प्रस्तावित तर 30 लाखाची तरतूद केली आहे.

पिंपरी मतदारसंघात नॅशनल वॉर मेमोरियलच्या धर्तीवर परमीवर चक्र विजेता पार्क तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी प्रस्तावीत केले असून 30 लाखाची तरतूद केली आहे. भोसरी मतदारसंघात अद्यावत विपश्यना केंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी प्रस्तावित केले असून 30 लाखाची तरतूद केली आहे. तसेच महापालिका शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गडकिल्ल्यांवर सहल काढण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ”अर्थसंकल्पात शहराच्या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प आणि कामे सुचविली आहेत. या कामांसाठी प्रशासनाच्या अर्थसंकल्पातूनच तरतूद वर्गीकरण केले जाणार आहे. अर्थसंकल्पात कोणतीही वाढ आणि घट केली नाही. प्रशासनाच्या 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पाला समितीने मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे. महासभेत चर्चा होऊन एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.