Pimpri: अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकतो अन् 15 लाख नुकसान भरपाई दिली तर चालेल का?, भाजप नगरसेवकाचा सवाल

वक्तव्य सभा कामकाजातून वगळले

एमपीसी न्यूज – दापोडी दुर्घटना कशी झाली?, या दुर्घटनेत दोषी कोण आहे?, महापालिका अधिकारी, कंत्राटदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अधिकाऱ्यांना कारागृह दाखवावे, अशी मागणी करत महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकतो अन् 15 लाख नुकसान भरपाई दिली तर चालेल का, असा सवाल भाजप नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी केला. दरम्यान, त्यांचे वक्तव्य सभा कामकाजातून वगळण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

महापालिकेची डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज (शुक्रवारी) आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. दापोडीत महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू होते. काम करत असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात महापालिका अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना 1 डिसेंबर 2019 रोजी दापोडी येथे घडली. अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांना शहीद दर्जा देण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता.

त्यावर बोलताना भाजपचे अंबरनाथ कांबळे म्हणाले, दापोडी दुर्घटनेला जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अधिकाऱ्यांना कारागृह दाखवावे. मृत्यू झालेल्याच्या कुटुंबातील आर्थिक मदत करून जीव परत येतो का? मी एक खड्डा खोदतो. त्यात अधिकाऱ्याला टाकतो आणि 15 लाख रुपये नुकसान भरपाई देतो चालेल का, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, त्यांचे वक्तव्य सभा कामकाजातून वगळण्याची सूचना भाजप नगरसेवक सागर अंगोळकर यांनी केली. त्यानंतर महापौर ढोरे यांनी कांबळे यांचे वक्तव्य सभा कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.