Pimpri: कोरोनाची माहिती देण्यासाठी डॉ. वर्षा डांगे यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांसंदर्भातील एकत्रित माहिती राज्य सरकारला देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही नियुक्ती केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारला याबाबतची संपुर्ण माहिती नियमित देणे आवश्यक आहे. त्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची माहिती, मृत्यू झाला असल्यास त्याबाबतची सविस्तर माहिती. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. याबरोबरच प्रत्येक रुग्णाचे ‘हाय’ व ‘लो  रिस्क कॉन्टॅक्ट’, कन्टेंनमेंन्ट प्लॅननुसार केलेल्या कामाची नियमित माहिती. कोरोना आजाराच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेली रुग्णालये, महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालयांची माहिती, उपलब्ध साधनसामुग्रीची माहिती देणे आवश्यक आहे.

त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  महापालिकेची सर्व माहिती एकत्रितपणे राज्य सरकार, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना पाठविण्याची जबाबदारी डांगे यांच्याकडे राहणार आहे. दररोज सकाळी 9 आणि सायंकाळी 4 वाजता अशी दिवसातून दोनवेळा राज्य कोविड नियंत्रण कक्षाकडे माहिती पाठविणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.