Pimpri : औषधांचे दर निश्चित करण्यासाठी ‘औषध किंमत नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात यावी -श्रीरंग बारणे

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले खासगी विधेयक

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस वाढत जाणारी औषधांची मागणी आणि या औषधांच्या विभिन्न किंमती याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आजाराच्या उपचारादरम्यान बसतो. त्यामुळे स्वस्त दरात मिळणा-या जेनेरिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, अशी औषधे आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याला आळा घालण्यासाठी विविध कंपन्यांचे औषधांचे दर निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘औषध किंमत नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात यावी अशा आशयाचे खासगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी आज(बुधवारी) लोकसभेत सादर केले.

औषधे निर्माण करणारी कंपनी औषधांची निर्मिती, साठवणूक, निर्यात व वितरण या सर्व गोष्टींवर औषधांची किंमत ठरवते. ही किंमत प्रत्येक कंपनीची विभिन्न असते. काही औषध कंपन्या व व्यावसायिक मनमानी कारभार करून औषधांची ज्यादा दराने विक्री करीत असतात.

  • अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक ‘औषध किंमत नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात यावी. ही समिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, नामांकित व शासनाद्वारे चालविले जाणारे हॉस्पिटल्सचे अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी, भारतीय औषध प्रणालीचे प्रतिनिधी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अशा सदस्यांची मिळून बनलेली असावी.

या समितीने औषधांची किंमत ठरवून दिल्यानंतर संबंधित कंपनीने व विक्री करणा-या व्यावसायिकाने ठरवून दिलेल्या किंमतीमध्येच औषधांची विक्री करावी, असे न केल्यास संबंधित कंपन्यांवर व कंपनीशी निगडीत असलेल्या इतर असोसिएशन व व्यावसायिक यांच्यावर कारवाई करून तत्काळ लायसन्स रद्द करण्यात यावे, अशा आशयाचे खासगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.