Pimpri: उद्याचा दिवस ‘मतदार राजा’चा; सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार मतदान

एमपीसी न्यूज – लोकशाहीचा मोठा उत्सव उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे. उद्याचा दिवस ‘मतदारराजा’चा असणार आहे. पिंपरी मतदारसंघात तीन लाख 53 हजार 545, चिंचवड मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार तर भोसरी मतदारसंघात चार लाख 41 हजार 125 मतदार आहेत. तीनही मतदारसंघातून एकूण 13 लाख 12 हजार 979 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवारी) मतदान होत आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून अण्णा बनसोडे, भाजप बंडखोर बाळासाहेब ओव्हाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड यांच्यासह सर्वाधिक 18 जण पिंपरीत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

चिंचवडमधून भाजपकडून लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 11 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, भोसरीत मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यासह 12 जण उमेदवार आपले नशिब अजामावत आहेत. सोमवारी त्यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एक लाख 67 हजार 600 महिला तर एक लाख 85 हजार 939 पुरुष आणि सहा अन्य असे तीन लाख 53 हजार 545 मतदार आहेत. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. हा मतदारसंघ राज्यातील सर्वात दुसरा मोठा मतदारसंघ आहे.

भोसरी मतदारसंघात एक लाख 99 हजार 493 स्त्री आणि दोन लाख 41 हजार 601 पुरुष आणि इतर 53 असे चार लाख 41 हजार 125 मतदार आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघातून एकूण 13 लाख 12 हजार 979 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत.

मतदानावर पावसाचे सावट
हवामान खात्याने उद्या (सोमवारी) दुपारनंतर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे आव्हान असणार आहे. उद्या पाऊस राहिल्यास मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.