BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिकेतील पदाधिका-यांच्या दालनाच्या सुशोभीकरणाची ‘टूम’ कायम

एमपीसी न्यूज – काटकसर, बचत अशा कांगावा करणा-या पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी दालने प्रशस्त करत करदात्या नागरिकांच्या पैशांची उळधपट्टी कायम ठेवली आहे. आता विधी समिती सभापतींनी दालनाचे सुशोभीकरण केले आहे. नवीन खुर्च्या, सोफे बसविले आहेत. हीच संधी साधत उपमहापौरांनी देखील नवेकोरे सोफे घेतले आहेत. तर, नवनियुक्त विरोधी पक्षनेत्यांनी देखील नवीन खुर्च्या, सोफ्याचे कव्हर बदलत उधळपट्टीला हातभार लावला आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जावून भाजपची एकहाती सत्ता आली. भाजप पदाधिका-यांनी महापालिकेचे वाहन नाकारत काटकसर करण्याचा कांगावा केला. तसेच स्वागताचे हारतुरे, महापालिकेची माहिती असलेली डायरी छापण्याचे बंद केले. तर, दुसरीकडे मात्र दालन प्रशस्त करण्यावर करदात्या नागरिकांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी सुरुच ठेवली आहे.

  • महापालिकेत भाजपची सत्ता येताच तत्कालीन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी ‘अॅन्टी चेंबर’ प्रशस्त करुन घेतले. त्यानंतर तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी दालनाच्या बाजूला स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून घेतले होते. प्रत्येक मजल्यावर पुरुष आणि महिलांसाठी अशी दोन स्वच्छतागृह असून तीस-या मजल्यावर पदाधिका-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असतानाही काळजे यांनी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून घेतले होते.

उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी दालनाची तोडफोड करुन बाजूला स्वच्छतागृह बांधून घेतले. दोन पाऊलावरच स्वच्छतागृह असताना स्वतंत्र स्वच्छतागृहावर पैशांची उधळपट्टी केल्याने भाजपवर टीका झाली होती. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी त्यांच्या दालनात नवेकोरे सोफे, खुर्च्या बसवून घेतल्या होत्या. विद्यमान स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुन्हा दालनाचा विस्तार केला. तर, महापौर जाधव यांनी दालनाच्या प्रवेशद्वाराचा मेकओव्हर केला.

  • आता विधी समिती सभापती अश्विनी बोबडे यांनी दालनात नवीन खुर्च्या, सोफे बसविले आहेत. तर, उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी देखील नवेकोरे सोफे घेतले आहेत. तिसरीकडे नवनियुक्त विरोधी पक्षनेत्यांनी देखील नवीन खुर्च्या, सोफ्याचे कव्हर बदलत उधळपट्टीला हातभार लावला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement