BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: दौरे झाले उदंड, आता महिला व बालकल्याण समितीला दौ-याचे वेध! 

300
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांचे देश, परदेश दौरे सुरुच आहेत. बार्सिलोना दौ-यावरुन सत्ताधा-यांवर टीकेची झोड उठली असताना आता महिला व बालकल्याण समिती सदस्यांना दौ-याचे वेध लागले आहेत. डिसेंबर महिनाअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात समितीचे सदस्य राजस्थान दौ-यावर जाणार आहेत. याबाबतचा ठराव आज (बुधवारी)झालेल्या सभेत आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. दरम्यान, दौ-याचा खर्च ‘गुपित’ ठेवण्यात आला आहे.  

विरोधात असताना भाजपचे पदाधिकारी परदेश दौ-याला कडाडून विरोध करत होते. दौ-याच्या विरोधात आंदोलने, पत्रकबाजी केली जात होती. परंतु, स्वत: सत्तेत येताच भाजप पदाधिका-यांच्या भुमिकेत मोठा बदल झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून देश, विदेश दौ-यांचा सुकाळ आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात सत्ताधा-यांनी तब्बल 16 दौरे केले असून त्यावर करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली आहे. सत्ता आल्यानंतर फुटकळ बचतीचे धोरण स्वीकारून भाजपा पदाधिका-यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात मात्र काटकसर व बचतीचा देखावा करून दीड वर्षांत झालेल्या दौ-यांवर कोट्यवधी रुपये उधळले आहेत.

स्मार्ट सिटीचे संचालक  13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान बार्सिलोनाचा दौरा करुन आले. बार्सिलोना दौरा विविध कारणांवरुन वादग्रस्त ठरला होता. त्यावरुन सत्ताधा-यांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान चीनचा दौरा करुन आले आहेत. आता महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना दौ-याचे वेध लागले आहेत.

महिला व बालकल्याण समितीच्या आज (बुधवारी)झालेल्या सभेत डिसेंबर 2018 अखेर किंवा जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौ-यावर जाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दौ-यासाठी येणा-या महिला सदस्यांकडून संमतीपत्र घेवून त्याकरिता येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता घेण्यासाठी ठरावाची स्थायी समितीकडे शिफारस करण्यात आली आहे. याबाबतच्या ठरावावर सूचक म्हणून भाजप नगरसेविका हिराबाई घुले यांची तर अनुमोदक म्हणून आरती चोंधे यांची स्वाक्षरी आहे. प्रस्तावाला समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

दीड वर्षातील महापालिका अधिकारी, पदाधिका-यांचे असे आहेत दौरे…!

तत्कालीन महापौर नितीन काळजे यांचा बर्सिलोना दौरा
आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा स्वीडन दौरा
अधिका-यांचा दक्षिण आफ्रिकेतील देशांचा दौरा
नगरसेवकांचा अहमदाबाद बीआरटीएस दौरा
महिला व बाल कल्याण समितीचा केरळ दौरा
नगरसेवक व अधिका-यांचा दिल्ली दौरा
क्रीडा समितीचा पटियाला व दिल्ली दौरा
महापौरांचा येरेव्हान, आर्मेनिया दौरा
महापौर परिषदेसाठी महापौर यांचा दौरा
आयुक्तांचे देशातर्गंत व परदेश दौरा
स्मार्ट सिटीसाठी गटनेत्यांचा स्पेन दौरा
शहर समितीच्या नियोजित परदेश दौरा
आता महिला व बालकल्याण समितीचा नियोजित राजस्थान दौरा

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3