Pimpri : पुणे-पिंपरी-चिंचवडला जोडणा-या दोन्ही मार्गावर वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पुणे शहराशी जोडणा-या दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. औंध मार्गे पिंपरी-चिंचवड शहराला पुणे शहराशी जोडणारा तिसरा मार्ग सोमवारी (दि. 5) वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग आणि जुना पुणे-मुंबई मार्ग या दोन्ही मार्गावर सर्व वाहतूक आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पुणे शहराशी जोडणारे तीन मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग सोमवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. औंधमार्गे पुण्याला जोडणारा मार्ग मुळा नदीवरील राजीव गांधी पुलादरम्यान पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने बंद करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर आणि जुना पुणे-मुंबई मार्ग (निगडी ते दापोडी मार्गे) या दोन मार्गावर वळवली आहे. यामुळे दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

  • जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस ब्रिज पासून कासारवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कासारवाडी आणि फुगेवाडी येथे पाणी आल्याने परिसरातील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.
हॅरिस पुलापर्यंत पाणी आले असल्याने या पुलावरील वाहतूक देखील बंद होण्याची शक्यता आहे. औंध रोडची वाहतूक बंद झाल्याने या मार्गावरील बहुतांश वाहतूक देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात आहे. त्यामुळे या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.