Pimpri : वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाय योजना

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती; आयुक्तालयाचे कंट्रोल रूम पिंपरी पोलीस ठाण्याजवळ

एमपीसी न्यूज – वाहतूक विभागाचे उत्तम नियोजन करून शहरातील वाहतूककोंडी किंवा रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कंट्रोल रूम आणि वाहतूक शाखेचे कंट्रोल रूम पिंपरी पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या जिममध्ये सुरू करण्यात येणार आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच मागणीनुसार पुरवठा देखील करण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि शहराची वाहतूक स्थिती पाहता स्थानिक आणि मालवाहतूक किंवा औद्योगिक अशा दोन प्रकारांमध्ये वाहतुकीचे विभाजन करता येईल. पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई जुना महामार्ग, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग या मार्गावर मालवाहतूक किंवा औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्या दृष्टीने या मार्गांवर वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्तालयाची कंट्रोल रूम आणि वाहतूक शाखेची कंट्रोल रूम पिंपरी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या जिममध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी आयुक्तालयाचे काम सुरू करताना कंट्रोल रूमला कॉल करून आयुक्तालय कार्यान्वित होणार आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांनी 100 नंबरवर फोन केल्यास तो फोन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला लागणार आहे.

सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायकडे मुबलक मनुष्यबळ नाही. त्यामुळे आहे तेवढ्या मनुष्यबळाचे गरजेनुसार विभाजन करून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येणार आहे. शिस्तबद्ध वाहन व्यवस्थेला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी कारवाई आणि विविध योजना आखल्या जाणार आहेत.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.