Pimpri : मेट्रोच्या कामकाजामुळे वाहतूक कोंडीत भर – विलास मडिगेरी

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोच्या कामकाजामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप महापालिका स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या सर्वत्र पावसाळा सुरू असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण शेजारील सेवा रस्त्यावर पडत आहे. पावसामुळे सेवा रस्ते खराब झाले असून खड्डे पडलेले आहेत. त्यातून चालताना नागरिक, वाहनचालकांला कसरत करावी लागत आहे. ब-याच ठिकाणी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून अपघात होऊन जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या कामकाजासाठी रस्ता बंद करावयाचे झाल्यास महापालिका किंवा पोलीस खात्याची परवानगी घेतली जात नाही. पर्यायी वाहतूक नियोजनाचे आवाहन केले जात नाही, सूचना फलक लावे जात नाही, रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक उपस्थित नसतात, असे मडिगेरी यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.