Pimpri : वाहतूक सुरक्षा पंधरवड्यास सुरुवात

वाहतूक नियम आणि सुरक्षा विषयी मार्गदर्शन करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याला आज (सोमवार)पासून सुरुवात झाली आहे. आज (सोमवार, दि. 4 फेब्रुवारी) ते सोमवार (दि. 18 फेब्रुवारी) दरम्यान, हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. वाहतूक नियम आणि सुरक्षा याविषयावर विविध उपक्रमांमधून यामध्ये मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.

पिंपरीमधून या अभियानाला सुरुवात झाली. पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने वल्लभनगर आगारात, नेहरूनगर बसडेपो मध्ये जाऊन कर्मचा-यांना वाहतूक सुरक्षेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नेहरूनगर येथील जैन शाळेमध्ये पिंपरी वाहतूक विभागाच्या महिला पोलीस विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार आहेत. वाहतूक विभागाचे कर्मचारी, रिक्षा चालकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. टाटा मोटर्स, थायसन कृप, अॅमक्युअर आदी कंपन्यांमध्ये जाऊन तिथल्या कर्मचा-यांशी संवाद साधत वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या पंधरवाड्यात पिंपरी वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियम पाळणा-या वाहन चालकांना पुष्पगुच्छ आणि चॉकलेट वाटपाचा देखील कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य वाहतूक विभागांकडून आरोग्य शिबीर, जनजागृतीपर कार्यक्रम, नागरिकांशी संवाद साधत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रस्त्यांवर वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासह वाहतूक पोलीस शहरातील काही सोसायट्यांमध्ये जाऊन देखील नागरिकांशी वाहतूक सुरक्षेविषयी हितगुज साधणार आहेत. आज पिंपरी वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना वाहतूक सुरक्षा विषयी माहिती दिली. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.