Pimpri : अनाथ आणि अपंगांना सहानुभूती नको समानतेची वागणूक द्या – यजुर्वेन्द्र महाजन

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशनचा दिव्यांग मुलांचा ऑर्केस्ट्रा उत्साहात

एमपीसी न्यूज – अनाथ आणि अपंग मुलांना समाजातील प्रत्येक घटकांकडून सहानुभूतीची वागणूक मिळते. अनाथ आणि अपंगांना दया दाखवून शाळेत पास केलं जातं. तिथेच ती मुले अधिक दुर्बल होतात. त्यामुळे त्यांना सहानुभूती आणि हिनतेची वागणूक देण्यापेक्षा समानतेची वागणूक दिली तर त्यांना आत्मविश्वास आणि जगण्याचे बळ मिळेल, असे मत यजुर्वेन्द्र महाजन यांनी व्यक्त केले.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ आणि अपंग मुलांच्या मदतीसाठी त्याच मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम चिंचवड येथे उत्साहात पार पडला. तसेच कार्यक्रमात इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या टँकरमुक्त गावाच्या प्रकल्पासाठी देखील निधी जमा करण्यात आला. यावेळी अमृतयात्रा चे नवीन काळे, तरुण संशोधिका स्विटी पाटे, ज्ञान प्रबोधिनीचे वामनराव अभ्यंकर, मनोज देवळेकर, नामदेवराव जाधव, पूजा कास्टिंगस चे संचालक अनिल कुलकर्णी, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल, रेखा मित्रगोत्री, सोनाली जयंत, सुजाता ढमाले, निर्मल कौर भोगल, रंजना कदम, स्मिता इळवे, शकुंतला बन्सल, आरती मुळे, पूजा सप्रे, कमलजीत दुल्लत, रमा मणगे, राजश्री मेहेर, नेहा देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात दीपस्तंभ संस्थेत जे अनाथ आणि अपंग विद्यार्थी समाजसेवेची मोठी स्वप्ने बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, या विद्यार्थ्यांनी गाणी, कविता आणि अनुभव सादर केले. कार्यक्रमात अनेक सहृदयी आणि संवेदनशील हातांनी दीपस्तंभला सढळ हाताने आर्थिक मदत केली. त्यानंतर अनघा मोडक यांनी दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन यांची मुलाखत घेतली. दीपस्तंभ आणि इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड या दोन संस्थांनी आपापल्या प्रकल्पांसाठी एकाच कार्यक्रमातून निधी उभारण्याचा प्रयत्न हे या कार्यक्रमाचे विशेष आहे.

यजुर्वेन्द्र महाजन म्हणाले, “दीपस्तंभ संस्थेत काही विद्यार्थी असे आहेत, ज्यांना हात, पाय, पाठीचा कणा आणि पालक यापैकी काहीच नाही. तरीही ते बाणेदारपणे जीवनाला सामोरे जात आहेत. त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेतून समाजाची सेवा करायची आहे. त्यांच्यातली ही देण्याची वृत्ती आपल्याला जगण्याची उर्मी देते. आपण किरकोळ गोष्टींविषयी करत असलेल्या तक्रारींचे उत्तर देते. स्वतःमध्ये असलेल्या मनोबलामुळे ही मुलं उभारलेली असतात. दीपस्तंभ हा भारतातील पहिला आणि एकमेव प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पात अनाथ आणि अपंग मुलांना बारावी नंतर निवासी महाविद्यालयीन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिले जाते. दानशूर व्यक्तींनी या कार्यात सहभागी होण्याची गरज आहे, असेही महाजन म्हणाले.
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी म्हणाल्या, “सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन सामाजिक संस्था समाजकार्यासाठी एकाच मंचावरून निधी उभारण्याचा यशस्वी प्रयत्न करतात, हा प्रयोग शहरात प्रथमच होत आहे. त्यासाठी संवेदना जागृत असलेला समाज तेवढ्याच ताकदीने त्यास दाद देत आहे, ही देखील आनंदाची बाब आहे. हे एका परिपक्व सामाजिक संघटनेचे लक्षण आहे.

अनाथ आणि अपंग हा समाजाचा असा घटक आहे, ज्यांना आजपर्यंत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काहीच मिळालेले नाही, तरीही ते समाजाला चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. देण्याची चांगली वृत्ती यापेक्षा चांगली असूच शकत नाही. हा भाव सदृढ समाजाने लक्षात घ्यायला हवा. इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने सहा गावांना टँकरमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. वेल्हे तालुक्यातील वाझेघर पिंपरी येथे विहिरीचे काम देखील सुरू झाले आहे. अनिल कुलकर्णी यांनी या कामासाठी चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने एक लाख रुपयांची देणगी दीपस्तंभ संस्थेला देण्यात आली. यजुर्वेन्द्र महाजन यांनी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कापशिकर यांनी केले. आभार प्रतिभा जोशी-दलाल यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.